राष्ट्रीय ‘एमयूएन’ परिषदेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा वक्तृत्वाचा डंका

राष्ट्रीय ‘एमयूएन’ परिषदेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा वक्तृत्वाचा डंका
राजविका कोल्हेला ‘बेस्ट डेलिगेट’; गिरिराज जमधाडे व गिरिजा मोदी यांनाही पुरस्कार
Kopargaon vijay kapse दि १२ ऑक्टोबर २०२६ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व, मुत्सद्देगिरी आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर बेंगळुरू येथे झालेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय ‘मॉडेल युनायटेड नेशन्स’ (MUN) परिषदेत घवघवीत यश संपादन केले. विविध राज्यांतील सीबीएसई शाळांमधील सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी आपली वेगळी छाप पाडली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजाची प्रतिकृती असलेल्या या प्रतिष्ठेच्या परिषदेत राजविका अमित कोल्हे हिने प्रसिद्ध महिला सुपरहिरो ‘हॉकगर्ल’ची प्रभावी भूमिका साकारत आपल्या वक्तृत्व व सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला समितीतील सर्वोच्च मानला जाणारा ‘बेस्ट डेलिगेट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गिरिराज प्रमोद जमधाडे याने प्रसिद्ध धनुर्धारी सुपरहिरो ‘ग्रीन ॲरो’ची भूमिका प्रभावीपणे साकारत ‘स्पेशल मेंशन’ पुरस्कार मिळविला. सिद्धिका रामचंद्र दादवानी हिने स्वीडनचे प्रतिनिधित्व करत प्रभावी युक्तिवाद करून ‘व्हर्बल मेंशन’ पुरस्कार पटकावला.

याच समितीत साईष्का सुरेश शेट्टी हिने मेक्सिकोचे, तर माही बाळासाहेब जाधव हिने दक्षिण आफ्रिकेचे आत्मविश्वासपूर्ण प्रतिनिधित्व केले. गिरिजा तुषार मोदी हिने माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या भूमिकेतून आक्रमक व प्रभावी मते मांडत ‘व्हर्बल मेंशन’ पुरस्कार मिळविला. रितिका रवींद्र गोंदकर हिने काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या भूमिकेतून आपले विचार मांडले.
प्रथम रैतानी आणि स्वरूप रवीशंकर गोंदकर यांनी नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करत क्रीडा धोरणांवर प्रभावी मते मांडली, तर अगस्त्य प्रताप सिंह याने प्रसिद्ध रेसर फर्नांडो अलोन्सो यांच्या भूमिकेचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या राष्ट्रीय परिषदेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी विविध समित्यांमध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना शिक्षिका अर्पिता चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय राष्ट्रीय यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांनी विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे, डायरेक्टर ऑफ स्कूल ऑडिट सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या शैला दुबे आणि हेड मिस्ट्रेस निलम पडवळ यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘एमयूएन’मधून विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ
‘मॉडेल युनायटेड नेशन्स’ हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. यामध्ये विद्यार्थी विविध देशांचे प्रतिनिधी बनून हवामान बदल, दहशतवाद, मानवाधिकार, गरीबी, आरोग्य आदी जागतिक प्रश्नांवर चर्चा, वादविवाद आणि वाटाघाटी करतात. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व व संवादकौशल्य, नेतृत्वगुण, समूहकार्य, निर्णयक्षमता आणि जागतिक दृष्टिकोन विकसित होतो.
“शाळा शैक्षणिक गुणवत्तेला जेवढे महत्त्व देते, तेवढेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही प्रयत्नशील असते. देशभरातील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागात संजीवनी इंटरनॅशनल स्कूलला अग्रभागी नेणे ही संजीवनीच्या विद्यार्थ्यांची आणि मार्गदर्शकांची मोठी उपलब्धी आहे.” — डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स



