शेतकरीहित आणि सहकाराशी बांधिलकी कायम ठेवून उद्योगसमूहाची यशस्वी वाटचाल सुरूच राहील-आ.आशुतोष काळे

शेतकरीहित आणि सहकाराशी बांधिलकी कायम ठेवून उद्योगसमूहाची यशस्वी वाटचाल सुरूच राहील-आ.आशुतोष काळे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न

Kopargaon vijay kapse दि ९ नोव्हेंबर २०२६ :- दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कारखाना व उद्योगसमूहाचे आधारस्तंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते कारखाना व गौतम सहकारी बँकेत विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच आसवनी विभागात कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे व त्यांच्या पत्नी सौ.चंद्रकलाताई कोळपे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यकारी संचालक दौलतराव मोरे व त्यांच्या पत्नी सुनंदा मोरे, तर पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेत संचालक सुदामराव वाबळे व त्यांच्या पत्नी शोभा वाबळे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी घालून दिलेल्या सहकार, शेतकरीहित आणि सामाजिक बांधिलकीच्या आदर्श विचारांवर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व संलग्न उद्योग समूहाची यशस्वी वाटचाल सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. कारखाना आणि संलग्न संस्थांच्या प्रगतीत शेतकरी, सभासद, कामगार आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असून त्यांच्या विश्वासाच्या बळावरच उद्योगसमूहाने प्रगतीची वाटचाल कायम ठेवली आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांचे हित जपत कारखान्याची आर्थिक घडी अधिक मजबूत करण्यासाठी आणि संस्थांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

चालू वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम शेती आणि पर्यायाने साखर उद्योगावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्ष आव्हानात्मक ठरू शकते, अशी चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आणि कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुखसमृद्धी यावी आणि सर्वांच्या कष्टांना यश लाभावे, अशी प्रार्थना करून त्यांनी सर्वांना दीपावली, बलिप्रतिपदा (पाडवा) व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, सेक्रेटरी, अधिकारी, विविध विभागाचे खाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




