कुंभारवाडीच्या नेटवर्क प्रश्नाला हिरवा कंदील; नाशिक-पुणे रेल्वेबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केली भूमिका
कुंभारवाडीच्या नेटवर्क प्रश्नाला हिरवा कंदील; नाशिक-पुणे रेल्वेबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केली भूमिका
कुंभारवाडीच्या नेटवर्क प्रश्नाला हिरवा कंदील; नाशिक-पुणे रेल्वेबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केली भूमिका
Sangmner vijay kapse दि. १६ नोव्हेंबर २०२६ : नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे दर सोमवारी संगमनेर नगरपालिकेत उपस्थित राहून नागरिकांशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतात. संगमनेर सेवा समितीने नगरपालिकेची जबाबदारी स्वीकारल्यापासून गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. अनेकदा नागरिकांचे छोटे-छोटे प्रश्न योग्य मार्गदर्शनाअभावी प्रलंबित राहतात. अशा प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ते सोडवण्याचा आपला प्रयत्न असतो, अशी भूमिका आमदार तांबे यांनी मांडली.

संगमनेर तालुक्यातील सात ते आठ गावांमध्ये अद्याप मोबाईल नेटवर्कची समस्या असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पीक पाहणी, ई-पीक पाहणी, ऑनलाइन अर्ज, विविध शासकीय योजनांचे अनुदान आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग यांसारख्या कामांवर त्याचा परिणाम होतो. कुंभारवाडी गावातील नेटवर्कचा प्रश्न आपण जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून सातत्याने मांडत होतो. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, कुंभारवाडी येथे मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच गावात मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याचे लेखी पत्रही प्राप्त झाले आहे. या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याचे सांगत आमदार तांबे यांनी त्यांचे आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार मानले.

नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनसुनावणी आवश्यक
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असली, तरी या कालावधीत समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. समिती सकारात्मक पद्धतीने अभ्यास करत असेल आणि त्यासाठी आणखी काही वेळ लागत असेल, तर तो देण्याची आमची तयारी आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत केवळ तांत्रिक बाबींचाच विचार न करता बाधित शेतकरी, स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रकल्पाचे समर्थक यांच्या भावना जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी यापूर्वी पुणे-नाशिक मार्गावर विविध ठिकाणी रास्ता रोको आणि आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी समितीला अनावश्यक मुदतवाढ देऊ नये आणि निर्णय प्रक्रियेत जनसुनावणीला महत्त्व द्यावे, अशा दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. समितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अधिकाधिक बैठका घेऊन तांत्रिक अभ्यास पूर्ण करावा आणि त्याचबरोबर जनसुनावणीच्या माध्यमातून लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.




