आपला जिल्हा

काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार : बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार : बाळासाहेब थोरात

मताधिकाराच्या रक्षणासाठी बूथस्तरावर मोहीम; ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत संगमनेरमध्ये संयुक्त बैठक व प्रशिक्षण

Sangmner vijay kapse दि २१ नोव्हेंबर २०२६ : प्रत्येक पात्र नागरिकाचा मताधिकार सुरक्षित ठेवणे ही लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मतदार याद्यांची बारकाईने तपासणी करून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या नावांचा शोध घ्या आणि संबंधित नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी मदत करा. काँग्रेसचे ‘वोट रक्षक’ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून मताधिकाराच्या रक्षणासाठी काम करतील, असे प्रतिपादन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जाहिरात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत संगमनेर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी उत्तर व दक्षिण तसेच अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थोरात बोलत होते.

जाहिरात

या प्रसंगी आमदार हेमंत ओगले, जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक शरद आहेर, उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह जिल्हा व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बीएलए-१ उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाचा मताधिकार अबाधित ठेवण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या संघर्षाला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. मतदानाचा अधिकारच असुरक्षित झाला, तर लोकशाही आणि संविधानासमोर गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ही लढाई केवळ काँग्रेस पक्षापुरती मर्यादित नसून लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे.

जाहिरात

भाजप निवडणूक आयोगाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात आल्याचा दावा करत या त्रुटींविरोधात काँग्रेस सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या आक्षेपांनंतर काही सुधारणा झाल्या असल्या, तरी त्या पुरेशा नाहीत. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित होईपर्यंत हा पाठपुरावा सुरूच ठेवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी केलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जाण्यापासून रोखता आली आहे. मात्र, यावर समाधान मानून चालणार नाही. प्रत्येक बूथवरील मतदार यादी तपासणे, वगळलेल्या नावांची प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि पात्र मतदारांच्या नावांचा पुन्हा समावेश होण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे, असे थोरात म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘वोट रक्षक’ म्हणून जबाबदारी स्वीकारून घराघरांत संपर्क साधावा. मतदाराचे नाव यादीत आहे का, नाव वगळले असल्यास त्यामागील कारण काय आणि संबंधित नागरिक मतदानासाठी पात्र आहे का, याची खात्री करावी. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, या भावनेने कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार हेमंत ओगले म्हणाले की, लोकशाहीसमोरील सध्याची आव्हाने लक्षात घेता कार्यकर्त्यांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेले प्रश्न जनतेपर्यंत पोहोचत आहेत. कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर सक्रिय राहून मतदार याद्यांची पडताळणी करावी आणि त्रुटींबाबत वेळेत आक्षेप नोंदवावेत. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून त्याच्या नावाची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे.

मतदार पडताळणीसाठी ‘आय ॲम वोट रक्षक’ संकेतस्थळ

काँग्रेसच्या वतीने ‘iamvoterakshak.in’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. पक्षाचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी १३ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाची माहिती जाहीर केली. मतदार यादीतून नाव वगळले आहे का, याची तपासणी करणे आणि नावाच्या पुनर्समावेशासाठी तक्रार नोंदविण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. संकेतस्थळावर नाव अथवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२६ नोव्हेंबरला ठाण्यात संविधान रक्षा मार्च

राष्ट्रीय अभियानाच्या पुढील टप्प्यात प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक ‘वोट रक्षक’ नियुक्त करण्याचे काँग्रेसचे नियोजन आहे. २२ ते ३० नोव्हेंबरदरम्यान बूथस्तरावर वगळलेल्या नावांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान रक्षा मार्च’ काढण्यात येणार असून, २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान गावपातळीवर ‘वोट बचाओ, देश बचाओ’ घोंगडी बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

संघर्षाच्या काळात सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

राहुल गांधी सातत्याने जनतेचे प्रश्न विविध व्यासपीठांवर मांडत असून, त्यांच्या भूमिकेवरील जनतेचा विश्वास वाढत आहे. आगामी काळ काँग्रेससाठी आशादायी असून कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात पक्षासोबत उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे