आपला जिल्हा

हृदय उजव्या बाजूला; झडप बदलताना डॉक्टरांसमोर अनोखे आव्हान 

हृदय उजव्या बाजूला; झडप बदलताना डॉक्टरांसमोर अनोखे आव्हान

डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ६० वर्षीय रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; CVTS विभागाकडून आतापर्यंत २,३३३ प्रमुख हृदयशस्त्रक्रिया

Ahilyanagar vijay kapse दि २१ नोव्हेंबर २०२६ : जन्मतःच हृदय छातीच्या उजव्या बाजूला आणि त्यात भर म्हणून हृदयाच्या महत्त्वाच्या झडपेत गंभीर बिघाड! अशा दुर्मीळ परिस्थितीमुळे ६० वर्षीय रुग्णाच्या उपचारात डॉक्टरांसमोर वेगळेच आव्हान उभे राहिले होते. मात्र, हृदयाच्या असामान्य रचनेचा बारकाईने अभ्यास करून डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील हृदयशल्यचिकित्सा विभागाने या रुग्णाची मायट्रल झडप बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

जाहिरात

काही महिन्यांपासून रुग्णाला श्वास घेण्यास त्रास, सतत थकवा आणि खोकला जाणवत होता. तपासणीत हृदयाच्या मायट्रल झडपेचा गंभीर विकार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, रुग्णाला जन्मजात डेक्स्ट्रोकार्डिया (Dextrocardia) ही अवस्था असून त्याचे हृदय छातीच्या नेहमीच्या डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या नियोजनात हृदयाची दिशा, अंतर्गत रचना आणि रक्तवाहिन्यांची स्थिती यांचा विशेष विचार करावा लागला.

जाहिरात

हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. विनोद चिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकारग्रस्त मायट्रल झडप काढून तिच्या जागी कृत्रिम झडप बसविण्यात आली. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. राहुल मामडे, तसेच डॉ. हर्षल वाळुंज आणि डॉ. केदार देशमुख यांचा सहभाग होता. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या प्रकृतीची सुधारणा होऊन रुग्ण ठणठणीत बरा होऊन त्यास डिस्चार्ज देण्यात आला.

जाहिरात

या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेबरोबरच रुग्णालयाच्या कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी (CVTS) विभागाने गेल्या दशकभरात विविध गुंतागुंतीच्या हृदयविकारांवरील उपचारात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. २०१६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत विभागात २,३३३ प्रमुख हृदयशस्त्रक्रिया आणि डायलिसिस रुग्णांसाठी २,१६३ एव्ही फिस्टुला प्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
विभागात हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांवर बायपास शस्त्रक्रिया (CABG), हृदयाच्या झडपा बदलणे व दुरुस्त करणे, जन्मजात हृदयदोषांवरील ASD/VSD शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांच्या फुगवट्यावरील शस्त्रक्रिया तसेच डायलिसिससाठी आवश्यक रक्तवाहिन्यांचा मार्ग तयार करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. या विविध शस्त्रक्रियांचा अनुभव, विशेष उपचारांचे नियोजन आणि संबंधित वैद्यकीय शाखांमधील समन्वय यामुळे गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे.
हृदयशस्त्रक्रियेबरोबरच विविध गंभीर आजारांवरील उपचार गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यातही रुग्णालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) यांसारख्या शासकीय आरोग्य योजनांतर्गत २०१४ ते जुलै २०२६ या कालावधीत रुग्णालयाच्या नोंदीनुसार एकूण १,४३,९९३ लाभार्थ्यांना उपचारांचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये १५३ असलेली वार्षिक लाभार्थी संख्या २०२५ मध्ये २०,६०१ पर्यंत पोहोचली. शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्णालयाला २०१८ पासून दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
रुग्णालयाची आरोग्यसेवा केवळ अहिल्यानगर जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांतून रुग्ण विविध उपचारांसाठी येथे येतात. हृदयविकार, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील विशेष उपचारांसाठी रुग्णालयाची निवड केली जात असल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागांतील रुग्णांनाही विशेष वैद्यकीय सेवांचा लाभ मिळत आहे. जन्मतःच हृदयाची रचना वेगळी असलेल्या रुग्णावर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया म्हणजे केवळ एका रुग्णाच्या उपचाराची यशोगाथा नाही, तर गुंतागुंतीच्या आजारांमध्ये अचूक निदान, अनुभवाधारित शस्त्रक्रिया आणि योग्य वैद्यकीय नियोजन किती महत्त्वाचे ठरते, याचे उदाहरण आहे.

 नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, अध्यक्ष, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या विकासावर सातत्याने भर दिला जात आहे. तसेच सुपर स्पेशालिटी विभागांच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे