आमदार सत्यजीत तांबे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

आमदार सत्यजीत तांबे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या; वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला दिले प्रोत्साहन

Rajur vijay kapse दि २१ नोव्हेंबर २०२६ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि पोषक वातावरण मिळणे ही काळाची गरज आहे. याच दृष्टीने पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मवेशी येथील विविध शैक्षणिक संस्थांना भेट देत तेथील शैक्षणिक व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला.

या दौऱ्यात त्यांनी श्री समर्थ विद्यालय, राजूर प्राथमिक शाळा तसेच मवेशी येथील शैक्षणिक संकुलाला भेट दिली. शाळेतील वसतिगृह, शालेय इमारती, भोजन हॉल आणि सेंट्रल किचनची पाहणी करून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थांमधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक कामकाजातील प्रश्न जाणून घेतले.
शिक्षण संस्थांच्या विकासासाठी केवळ भौतिक सुविधा पुरेशा नसून त्यासोबत विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक परिसर मिळणेही महत्त्वाचे आहे, अशी भूमिका आमदार तांबे यांनी यावेळी मांडली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कामकाजाची माहिती घेत संबंधित संस्थांच्या आवश्यकताही समजून घेतल्या.
या भेटीदरम्यान शैक्षणिक संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, परिसराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. शैक्षणिक संस्थांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सातत्य ठेवून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मवेशी परिसरात पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांच्या कार्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास परिसराच्या पर्यावरणीय समृद्धीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या चांगल्या कामात आपणही नेहमी सोबत असल्याची ग्वाही दिली.





