पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा वारसा जपणे अभिमानास्पद -आ. आशुतोष काळे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा वारसा जपणे अभिमानास्पद -आ. आशुतोष काळे
आ.आशुतोष काळेंच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची महाआरती
कोपरगाव विजय कापसे दि ३१ मे २०२४ :- आपल्या देशाला प्राचीन काळापासून अनेक कर्तबगार स्त्रियांचा वारसा लाभलेला असून ज्या-ज्यावेळी कर्तबगार स्त्री नेतृत्वाचा उल्लेख होतो त्या-त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो. त्यांनी समाजकार्य करतांना समाज उन्नतीसाठी प्रयत्न करून समाज हितासाठी लोककल्याणकारी कामे केली आहे. त्यांच्या जयंतीदिनी मोफत नेत्र रोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर राबवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा वारसा जपणे अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कमिटी व समस्त कोळपेवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, इच्छा शक्ती प्रबळ असेल तर वैयक्तिक दु:ख देखील लोक कल्याणाच्या मार्गापासून तुम्हाला विचलित करू शकत नाही. हे धर्माचे ज्ञान आणि समाज मनाची जाण असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या आचरणातून सिद्ध करून दाखविले. लोकांची सेवा करणे आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले.
त्यांच्या कार्याचा वारसा अशा समाजोपयोगी शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणे जोपासला जात आहे. त्याबद्दल समाधान व्यक्त करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कमिटी व समस्त कोळपेवाडी ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी कोळपेवाडी व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.