दिव्यांगांची सेवा, ईश्वर सेवा – आ. आशुतोष काळे
दिव्यांगांची सेवा, ईश्वर सेवा – आ. आशुतोष काळे
दिव्यांगांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न -आ. आशुतोष काळे दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव मोजमाप व नाव नोंदणी शिबिर संपन्न, १९३ दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव
कोपरगाव विजय कापसे दि १४ जुन २०२४ :- दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करतांना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात. अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशातून दिव्यांगांची सेवा हि ईश्वर सेवा समजून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरीटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप्ड, मुंबई व आ. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व आवश्यक साहित्य नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की, अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करतांना परावलंबी जीवन जगावे लागते. त्यामुळे दिव्यांगांच्या मनात असहाय्यतेची भावना निर्माण होते. त्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांना जीवन जगण्यासाठी पुन्हा नवी उमेद निर्माण व्हावी व त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरांचे आयोजन करून त्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप केले आहे. यापुढील काळातही कृत्रिम अवयवापासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांसाठी हे शिबीर सातत्याने सुरु राहील. तसेच दिव्यांग बांधवांना शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. या शिबिरात निकामी अवयव बसविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने तपासणी करून कृत्रिम अवयवांचे मोजमाप करण्यात आले. तसेच दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साहित्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच त्यांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप्ड, मुंबईचे सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, मनसे दिव्यांग सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी आ.आशुतोष काळे आशेचा किरण
कृत्रिम अवयवाबाबत ग्रामीण भागातील दिव्यांगांना फारशी माहिती नसते. आ. आशुतोष काळे यांनी काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालवितांना मतदार संघातील दिव्यांगांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या शिबिराला कोपरगाव मतदार संघातून दिव्यांगांचा मिळालेला प्रतिसाद पाहता दुर्दैवाने अवयव गमाविणार्या व्यक्तींचा सन्मान पुनर्स्थापित करण्यासाठी मोठी मदत होणार असून दिव्यांगांसाठी आ. आशुतोष काळे आशेचा किरण बनले आहे.