श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा – सनातन संस्थेचे आवाहन
श्रीगुरुतत्त्वाचा एक हजारपटीने लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा – सनातन संस्थेचे आवाहन
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी; तर कोपरगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’

कोपरगांव विजय कापसे दि १६ जुलै २०२४ – हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादी काळापासून चालू आहे. गुरुपौर्णिमेला नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ समाजाला घेता यावा, यांसाठी या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै २०२४ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७५ ठिकाणी तर कोपरगांव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय,धारणगाव रोड येथे सायंकाळी ५.०० वा होणार आहे. तरी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.

प्राचीन काळापासून राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि ‘रामराज्या’सारख्या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार सर्वाेत्तम श्रीगुरुसेवाच आहे. यांसाठी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.




