निसर्गाने समृध्द संगमनेर तालुका निर्माण व्हावा – दुर्गाताई तांबे
राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी व शॅम्प्रोच्या वतीने २ हजार वृक्षांचे रोपण
संगमनेर प्रतिनिधी दि २४ जुलै २०२४– पर्यावरणाचे संवर्धन सर्व सजीव प्राण्यांसाठी महत्वाचे असून यापुढे वृक्षतोड थांबली पाहिजे. दंडकारण्य अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली असून वृक्षसंवर्धनातून निसर्गाने समृध्द संगमनेर तालुका निर्माण व्हावा असे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी व शॅम्प्रो यांच्या वतीने दंडकारण्य अभियानांतर्गत कोंची व कोकणगाव येथील डोंगरावर २००० वृक्षांचे रोपन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बाबा ओहोळ, आर.एम.कातोरे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, अण्णासाहेब थोरात, दिपालीताई वर्पे, मंगलताई जोंधळे, आशाताई जोंधळे,शॅम्प्रो व राजहंस कंपनीचे सर्व संचालक व कर्मचारी वृंद, निर्धनेश्वर विद्यालयचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद, कोकणगाव, कोंची येथील ग्रामस्थ, वनविभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रस्त्यांच्या दुर्तफा विविध रंगीबेरंगी फुलांचे बीजारोपन करण्यात आले.
यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, ग्लोबल वार्मिगच्या समस्येमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. प्रत्येकाने मुलभूत कर्तव्य म्हणून वृक्ष जपली पाहिजे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेले दंडकारण्य अभियान हे आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जन लोकचळवळ झाली आहे. या अभियानाची आंतर राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली असून आपल्या तालुक्यात अनेक उघडया बोडख्या डोंगरांवर झाडे दिसू लागली आहेत. विद्यार्थी हे खरे वृक्षदूत असून यापुढे प्रत्येकाने वृक्षरोपनाबरोबर कुटुंबामध्ये ही जाणीव जागृती केली पाहिजे.
यावेळी बाबा ओहोळ म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानाने तालुक्यात पर्यावरणाचे महत्व वाढीस लावले. विद्यार्थ्यांनी एक मुल एक झाड ही संकल्पना राबवत वृक्षजतन करावे. प्रत्येक शाळेत एक बियाणे बँक स्थापन करावी. विविध फळांच्या बिया जमा करुन शाळेत जाता येता रस्त्यांच्या दुर्तफा रोपन करुन त्यांचे संवर्धन करावे. यावेळी पर्यावरण गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.