ब्राह्मणगावच्या पर्यावरण प्रेमींने पिंपरी चिंचवड येथील ‘आरंभ फाउंडेशन’ला दिल्या १० हजाराहून अधिक देशी वृक्षांच्या बिया भेट
ब्राह्मणगावच्या पर्यावरण प्रेमींने पिंपरी चिंचवड येथील ‘आरंभ फाउंडेशन’ला दिल्या १० हजाराहून अधिक देशी वृक्षांच्या बिया भेट
ब्राह्मणगावच्या पर्यावरण प्रेमींने पिंपरी चिंचवड येथील ‘आरंभ फाउंडेशन’ला दिल्या १० हजाराहून अधिक देशी वृक्षांच्या बिया भेट

कोपरगाव विजय कापसे दि २४ जुलै २०२५–आपल्याकडे अनेकजण झाडं लावतात, पण काहीजण असेही असतात जे भविष्यातली हजारो झाडं उगवण्यासाठी आजच्या बीजांची शिदोरी उराशी बाळगतात. असाच एक प्रेरणादायी शेतकरी म्हणजे भागिनाथ बाबासाहेब आसने. यांनी २० जुलै २०२५ रोजी त्यांनी पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या पिंपरी चिंचवड येथील ‘आरंभ फाउंडेशन’ला तब्बल १०,००० हून अधिक देशी वृक्षांच्या बिया भेट म्हणून दिल्या. ही बीज भेट मित्र विवेक देशमुख यांच्या हस्ते, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैष्णवी विनायक पाटील यांच्याकडे पोहोचविण्यात आली.

या बीजदानामध्ये आंबा (७०), बोर (३,०००), चिंच (२००), रामफळ (१,०००), सिताफळ (४,०००), कडुलिंब (२५०), बेल (५१), बकाण (१००), करंज (१००), बाभळी यांचा समावेश आहे — एकूणात भविष्यात हजारो झाडांचं आयुष्य घेऊन येणाऱ्या बीजांचं दान.

“मी आरंभ फाउंडेशनच्या बीज संकलन WhatsApp ग्रुपचा गेल्या तीन वर्षांपासून सदस्य आहे. तिथूनच बीजाचं महत्त्व कळलं… आणि हे ही समजलं की, पर्यावरण रक्षणासाठी बीजदान हा सुद्धा एक मोठा आणि शांत पण प्रभावशाली मार्ग असतो,” असे भावनिक उद्गार आसणे यांनी व्यक्त केले.

गेल्या तीन वर्षांत सामाजिक वनीकरण विभागाला बिया देणाऱ्या आसणे यांचं हे आरंभ फाउंडेशनकडे पहिलं योगदान असलं तरी, त्यामागे असलेली जाणीव आणि समर्पण अतिशय मोठं आहे.

आरंभ फाउंडेशनने नुकतीच आषाढी वारी निमित्त साडेतीन लाखांहून अधिक दुर्मिळ देशी बिया वारकऱ्यांना बीजप्रसाद स्वरूपात वाटून एक नवा उपक्रम राबवला. संस्थेचे बीज संकलन, रोप निर्मिती, वृक्षसंवर्धन, प्लास्टिक पुनर्वापर आणि जनजागृती हे उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने प्रभावी वाटचाल करत आहेत.
“प्रत्येक बीज हे फक्त एक झाड नाही, तर भविष्यातील सावली, अन्न, प्राणवायू आणि निसर्गाशी नातं जपणारा एक जीव असतो,” हे शेतकरी आसने यांचे कार्य आपल्याला नेहमीच आठवण करून देत राहील.




