पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संजीवनी सैनिकी स्कूलचा ‘राष्ट्रीय नाद’ घुमणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संजीवनी सैनिकी स्कूलचा ‘राष्ट्रीय नाद’ घुमणार
‘एकता परेड-२०२६’मध्ये ब्रास बँड पथकाचे दिमाखदार सादरीकरण; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकतानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता परेड-२०२६’मध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे ब्रास बँड पथक आपल्या सुरेल, शिस्तबद्ध आणि दमदार वादनाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढविण्यास सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात सादरीकरण करण्याचा बहुमान संजीवनीच्या विद्यार्थ्यांना मिळाला असून, त्यांच्या वादनातून संजीवनीचा ‘राष्ट्रीय नाद’ घुमणार आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्रानुसार, संजीवनीच्या ब्रास बँड पथकाची ‘स्कूल बँड डिस्प्ले’मधील ‘बॉईज ब्रास बँड’ या श्रेणीसाठी निवड झाली आहे. या निवडीनंतर २१ ऑक्टोबरपासून एकतानगर येथे देशभरातील निवडक शालेय बँड पथकांसोबत संयुक्त सरावाला सुरुवात झाली. गेल्या दहा दिवसांपासून भारतीय लष्कराच्या पथकांसोबत सराव करताना संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी वादनातील अचूकता, संचलनातील शिस्त, ताल-लय आणि सांघिक समन्वय यांचा उत्कृष्ट परिचय करून दिला आहे.

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर संजीवनीच्या पथकाला मिळालेली ही संधी त्यांच्या मेहनतीची, गुणवत्तेची आणि सातत्यपूर्ण सरावाची राष्ट्रीय स्तरावर उमटलेली मोहोर मानली जात आहे. प्रत्येक सूर, ठेका आणि संचलनातील पाऊल अचूक साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त सरावातही त्यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून आजच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विश्वस्त सुमित कोल्हे हे विद्यार्थ्यांसोबत एकतानगर येथे उपस्थित आहेत. या यशस्वी वाटचालीत विश्वस्त सुमित कोल्हे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन, संगीत शिक्षक महेश गुरव यांचे प्रशिक्षण, कल्चरल हेड शुभम जाधव यांचे नियोजन, कॅम्पस को-ऑर्डिनेटर विजय भास्कर यांचे समन्वय आणि प्राचार्य कैलास दरेकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तसेच बँड प्रशिक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य प्रशिक्षण, संधी आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, हे संजीवनीच्या ब्रास बँड पथकाने दाखवून दिले आहे. एकतानगर येथे होणारे आजचे सादरीकरण म्हणजे केवळ संगीताचे वादन नसून शिस्त, मेहनत, सांघिक भावना आणि राष्ट्रप्रेमाचा गौरवपूर्ण आविष्कार ठरणार आहे. संजीवनीच्या या कामगिरीमुळे कोपरगावसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असून, ही कामगिरी निश्चितच अभिमानास्पद आहे.




