संजीवनी अकॅडमीचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

संजीवनी अकॅडमीचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
‘झेप, प्रगती आणि सिंहगर्जना’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी घडविले सांस्कृतिक वैभवाचे मनमोहक दर्शन
Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६: संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ‘झेप, प्रगती आणि सिंहगर्जना’ या संकल्पनेवर आधारित उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त, सांघिक वृत्ती, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात विविध क्रीडाप्रकारांसह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक झांक्या आणि सामूहिक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.

या महोत्सवाला संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, संजीवनीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक, काळाराम मंदिराचे विश्वस्त व संजीवनी पॉलिटेक्निकचे माजी विद्यार्थी श्री. मिलिंद तारे, संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरिकर, संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या सुधा सुब्रमण्यम तसेच संजीवनी अकॅडमीची माजी विद्यार्थिनी अनुष्का सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलागुणांतून विविध विषयांवर आधारित झांक्यांचे सादरीकरण केले. यामध्ये प्राचीन भारतीय खेळ, आदिवासी जीवनशैली व परंपरा, भारतातील पवित्र नद्या, पर्वतरांगा, सांस्कृतिक वारसा, विविध देशांच्या संस्कृती तसेच जागतिक वैविध्य अशा अनेक विषयांचा समावेश होता. आकर्षक वेशभूषा, देखणी सजावट, विषयाला अनुरूप मांडणी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे प्रत्येक सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

यावेळी उद्योजक मिलिंद तारे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे, त्यांच्या शिस्तीचे तसेच शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील कल्पकता, उत्साह आणि सांघिक भावना पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. संजीवनी अकॅडमीची माजी विद्यार्थिनी अनुष्का सोनवणे हिने आपल्या शालेय आठवणींना उजाळा देताना शाळेतील शिक्षकांचा आपल्या जीवनाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले.
डाॅ. मनालीताई कोल्हे, मिलींद तारे, डाॅ. ठाकुर, प्रा. मिरीकर, आदीं समवेत महोत्सवातील विजयी विद्यार्थी
सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. मनाली कोल्हे
‘झेप, प्रगती आणि सिंहगर्जना’ या घोषवाक्याला साजेसा हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरला. संजीवनी अकॅडमीच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा मिळत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ज्ञानदानासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे व्रत संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी सुरू केले आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अविरतपणे पुढे सुरू आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश संपादन करावे, हा संजीवनी अकॅडमीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता, शिस्त आणि सांघिक भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत संजीवनीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी व्यक्त केले.



