धूळमुक्त नाही तर कोपरगाव चिखलयुक्त झाले आहे – महेंद्र नाईकवाडे
धूळमुक्त नाही तर कोपरगाव चिखलयुक्त झाले आहे – महेंद्र नाईकवाडे
कोपरगाव विजय कापसे दि २६ जुलै २०२४– कोपरगाव शहरासह तालुक्यात रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे.केवळ सोशल मीडियावर विकास पसरला पण प्रत्यक्षात रस्ते वीज आणि पाण्याचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले आहे. ठराविक कार्यकर्त्यांचा विकास करून विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार काळे हे तालुक्याचा विकास झाल्याच्या गप्पा करत असतील तर दुर्दैवी आहे.कोपरगाव धूळमुक्त झाले नसून अल्पशा पावसातच त्या धुळीचे चिखलात रूपांतर होवून कोपरगाव चिखलयुक्त झाल्याची टीका युवा उद्योजक महेंद्र नाईकवाडे यांनी केली आहे.
बाजारपेठेत नागरिकांचे चिखलामुळे होणारे हाल झाकण्यासाठी धुळमुक्त केल्याच्या खोट्या वावड्या आमदार काळे यांच्याकडून उठवल्या जात आहे.नगरपालिकेचा हक्काचा निधी देखील आपल्याच नावावर खपवणे सुरू आहे.माझ्या मर्जीतील ठेकेदार येत नाही तोवर काम पुढे जाऊ द्यायचे नाही अशी अप्रत्यक्ष कार्यपद्धती आ.काळे यांनी राबवली आहे.माता भगिनींना शहरातील अनेक भागात पायी चालता येत नाही अशी अवस्था आहे.जे शहराचे ते ग्रामीण भागाचे आहे.शेतकरी कष्टकरी शहराकडे येताना त्यांना पावसाळ्यात चिखल व खड्डेयुक्त आणि उन्हाळ्यात धुळीत प्रवास करावा लागतो.हजारो कोटींच्या वल्गना कागदोपत्री झाल्या पण तालुका व सबंध मतदारसंघ मात्र प्रत्यक्ष विकासापासून कोसो दूर आहे.सत्तेचा वापर जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यासाठी झाला पाहिजे होता मात्र तो केवळ भूलथापा देण्यात झाला.खुद्द आमदार महोदयांच्या पक्षाचे लोक रस्त्यांच्या बाबतीत आंदोलने करत टाहो फोडत असताना काहींना मात्र चक्क गाव धुळमुक्त झाल्याचा साक्षात्कार होणे हास्यास्पद आहे.
तीन तीन वेळा एकच रस्ता कसा उखडतो ? नागरीकांना हक्काचा असलेला निधी मात्र सोयीनुसार तोंडाला पाने पुसली जावी तसा उधळपट्टी करून कार्यकर्ते लाभार्थी केले जातात.जर धूळमुक्त गाव झाले असेल तर प्रत्यक्षात एकदा व्यापारी वर्गाला रोज भेडसावणारा त्रास जाऊन बघून यावे.पाऊस थांबला की धूळ जोमात आणि पाऊस आला की चिखल दुकानात अशी अवस्था रोज सुरू आहे. स्वतःचे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी चिखलात बसून आंदोलन करतात त्यामुळे खोटे बोलून जनतेला वेड्यात काढण्या ऐवजी आमदार काळे यांनी वस्तुस्थिती मान्य करावी.आमदार काळे यांना खुश करण्यासाठी त्यांचे काही कार्यकर्ते खोट्या बातम्या पेरतात.कदाचित त्यांच्या डोळ्यात आमदारांची खोट्या प्रसिद्धीची धूळ गेल्याने रस्त्यावर असणारे खड्डे,धूळ आणि चिखल त्यांना दिसत नसावा असा टोला नाईकवाडे यांनी लगावला आहे.
आम्ही मुख्य बाजारपेठेत दैनंदिन कामानिमित्त जनतेची बाजू ऐकतो तर पावसाळ्यात अक्षरशः चिखलामुळे त्यांना वाहने चालवत खरेदीला येणे मुश्किल झाले आहे.नागरिकांना हा त्रास होत असल्याने व्यावसायिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे.खराब रस्त्यांमुळे बाजारपेठेवर परिणाम जाणवत असून शहर धुळमुक्त झाल्याची चुकीची माहिती देऊन जनतेला अधिक गैरसोयीकडे ढकलू नका तर वस्तुस्थिती समजून घेऊन व्यक्त व्हा अशी भावना व्यापारी वर्गात व जनतेत उमटत आहे.