संजय गांधी निराधार योजनेच्या ६३७ पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मान्यता – आ.आशुतोष काळे
संजय गांधी निराधार योजनेच्या ६३७ पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मान्यता – आ.आशुतोष काळे
वीज पडून जनावरे दगावलेल्या शेतकऱ्याला ८१ हजारांची मदत
कोपरगाव विजय कापसे दि ३१ जुलै २०२४ :- कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांना आवश्यक ती मदत केली आहे. त्यामुळे आजवर अनेक योजनांचा हजारो पात्र नागरीकांना लाभ मिळाला असून आजही स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला , निराधार, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास ६३७ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून या नागरिकांना लवकरच आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयात नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजने संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संजय गांधी निराधार योजने बरोबरच विविध लाभार्थी योजनांचा आढावा घेवून या बैठकीत ६३७ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, शासनाच्या वतीने समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून साडे चार वर्षात हजारो नागरिकांना या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यासाठी वेळोवेळी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सहाय्यता कक्ष उभारून नागरिकांच्या अडचणी दूर केल्या आहेत व जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कोपरगाव ते अहमदनगर मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांना देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे.आजपर्यंत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना अशा अनेक योजनांचा लाभ मतदार संघातील हजारो पात्र लाभार्थ्यांना मिळवून दिला असून यापुढे देखील उर्वरित लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विविध योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.
चौकट:-काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथे वीज पडून शेतकऱ्याची जनावरे दगावली होती.सदरच्या घटनेचा आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार सदर घटनेचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला होता. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्या मदतीचा ८१ हजार ४६४ रुपयांचा नुकसान भरपाईचा मंजुरी आदेश वाटप आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त शेतकरी संदीप कांदळकर यांना देण्यात आला.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देवून मदतीसाठी पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे नुकसानग्रस्त शेतकरी संदीप कांदळकर यांनी आभार मानले.