प्रारूप आराखड्यानुसार सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करा; आ. आशुतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी
प्रारूप आराखड्यानुसार सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करा; आ. आशुतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी
पोहेगाव येथे विविध विकासकामांची पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑगस्ट २०२४:- नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी असून हि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून हि विकासकामे दर्जेदार व दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी सबंधित अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे प्रारूप आराखड्यानुसार सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करा अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
आ.आशुतोषदादा काळे यांनी नुकतीच पोहेगाव येथे विविध विकासकामांची पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून सुरु असलेले रस्ते, जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजना यांची सद्यस्थितीत सुरु असलेली कामे याबाबत माहिती जाणून घेवून गुणवत्तेच्या बाबतीत सूचना केल्या. ते म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्ता (रामा ६५), नाशिक जिल्हा हद्द ते पोहेगाव रस्ता ह्या प्रमुख रस्त्यांसह पोहेगावला जोडणाऱ्या जवळजवळ सर्वच रस्त्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. पोहेगाव-देर्डे चांदवड-कुंभारी रस्त्यासह अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच जल जीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू असुन तलाठी कार्यालय इमारतीसाठीही निधी मंजूर आहे. पोहेगावसह कोपरगाव तालुक्यातील श्री गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मयुरेश्वर देवस्थान सुशोभीकरण कामासाठीही निधी उपलब्ध करुन दिला असुन हे कामही पूर्ण झाले आहे त्यामुळे तेथे येणाऱ्या भक्तांना विविध सोयी सुविधा मिळण्यास मदत झाली आहे.
शिर्डीला होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणतांबा फाट्यावरून अवजड वाहने झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्यावरुन जात असतात. त्यामुळे वाहतूक जास्त असल्यामुळे ह्या रस्त्याची दर्जोन्नती होणे आवश्यक असून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असून त्यामध्ये लवकरच यश मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोहेगाव व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.