निळवंडे धरणाचे अतिरिक्त पाणी टंचाईग्रस्त भागाला सोडा – विवेकभैय्या कोल्हे
निळवंडे धरणाचे अतिरिक्त पाणी टंचाईग्रस्त भागाला सोडा – विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४-निळवंडे धरण भरल्याने त्यातून जाणारे अतिरिक्त पाणी निळवंडे कालव्याद्वारे टंचाई निर्माण होणाऱ्या भागाला देऊन पाणी संकट कमी होण्यास मदत होईल.कोपरगाव व राहता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील अनेक गावांना या उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे नैसर्गिक असमतोलाचा सामना करण्यास मोठा दिलासा मिळेल यासाठी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता यांचेकडे अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मागणी केली आहे.
हा पर्जनछायेतील पट्टा असून अनेक गावांना ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचवणे हे देखील जिकरीचे झाले आहे.मोठ्या प्रमाणात निळवंडे धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होत असून त्याचे कालव्याद्वारे योग्य नियोजन झाल्यास भविष्यात भेडसावणाऱ्या समस्येला तोंड देण्यास मदत होईल त्यामुळे हे अतिरिक्त पाणी आवश्यक गावांना देण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी आहे.
एकीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे तर दुसरीकडे मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले असून आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ अनेक भागात आली आहे.अशा वेळी अपव्यय होणाऱ्या पाण्याचा विनियोग व्यवस्थित झाला तर निश्चितच नागरिक आनंदी होतील अशी भावना विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.