बिबट्याच्या हल्ल्यात जेऊर कुंभारीत कुत्रा ठार;सीसीटीव्ही मध्ये कैद
बिबट्याच्या हल्ल्यात जेऊर कुंभारीत कुत्रा ठार;बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑगस्ट २०२४– कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ,चांदेकसारे, डाऊच खुर्द,घारी आदी गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून अशीच एक घटना मंगळवार दि ६ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील बापु गिरमे व सुरेश गिरमे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानाने हल्ला करून जागीच ठार केले असून ही घटना सीसी टिव्ही मध्ये कैद झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील दोन वर्षापासुन जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे देखील अवघड झाले आहे.आतापर्यंत बिबटयाने अनेक जनावरांचा बळी घेतला आहे त्यामुळे नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे शेळ्या, बकऱ्या, कुत्रे या प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक मोठे भयभीत झाले आहेत.
वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन दिलेले असून वनविभागाने तात्काळ या भागात पिंजरे लावावे अशी मागणी सोशल मिडिया कोपरगाव तालुका अध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी केली आहे.