आ.थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे दिंडीतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये
नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार थोरात यांनी केली होती सरकारकडे मागणी
संगमनेर प्रतिनिधी दि ९ ऑगस्ट २०२४– शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांच्या साई पालखी दिंडीला नाशिक – पुणे महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत मिळावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. आज त्या कुटुंबातील सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ही मदत मिळाली आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला निघालेल्या साई दिंडीला 3 डिसेंबर रोजी नाशिक – पुणे रस्त्यावर घारगाव जवळ भीषण अपघात झाला होता. हा अपघात झाल्यानंतर काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेला तातडीने मदतीकरता सूचना केल्या होत्या. यानंतर सर्व वारकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन ही केले आणि तातडीने नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात या सर्व वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत मिळावी अशी आग्रही मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज को-हाळे येथील मृत वारकरी ताराबाई गंगाधर गमे, शिर्डी येथील बबन पाटीलबा थोरे, कणकुरी येथील भाऊसाहेब नाथा जपे व मढी बुद्रुक येथील बाळासाहेब अर्जुन गवळी या सर्व वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये मंजूर झाले आहे.
ही मदत मिळाल्याने या सर्व कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मदतीसाठी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल गमे,थोरे,जपे, गवळी कुटुंबीयांसह राहता मतदार संघातील विविध गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.