कोपरगाव येथील ताराराणी मल्टीट्रेड कंपनीची जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयक पदी निवड
कोपरगाव येथील ताराराणी मल्टीट्रेड कंपनीची जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयक पदी निवड
ग्रामीण भागातील कंपनीची जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाल्याने नक्कीच हा कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोपरगाव विजय कापसे दि ४ सप्टेंबर २०२४– गेल्या अनेक वर्षापासून ब्युटी पार्लर क्षेत्रात कार्य करत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव येथील ताराराणी मल्टीट्रेड अँड सर्विसेस या कंपनीची अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ यांच्या अहमदनगर जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती ताराराणीचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी दिली आहे.
या विषयी भाऊसाहेब वाघ यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, कंपनीने मागील वर्षात उत्कृष्ट काम केल्यामुळे या वर्षापासून अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक संस्था म्हणून कंपनीला मान्यता मिळाली असून कंपनीच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याला शासनाच्या ब्युटी पार्लर कोर्स साठी अधिकृत प्रशिक्षण संस्था नेमण्याचा अधिकार प्राप्त झालेला असून संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत येणाऱ्या वर्षभरात तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी एका ब्युटी पार्लर संस्थेला अधिकृत प्रशिक्षण संस्थेची मान्यता देण्यात येणार असून त्यामार्फत गोरगरीब मुलींना ब्युटी पार्लरचा कोर्सचे शासन मान्य संस्थेतुन ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तसेच ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी नवीन व्यवसाय उभारणीसाठीचे कर्ज प्रकरण शासनाचा वेगवेगळ्या योजना विषयी मार्गदर्शन केले जाणार असल्याच माहिती संस्थेच्या संचालिका जयश्री रोहमारे व विजया वाघ यांनी दिली आहे.