मोकाट जनावरांचा नागरीकांना होणारा त्रास तातडीने थांबवा – विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव शहरात मोकाट जनावरांच्या झुंजी नागरिकांसाठी बनल्या घातक
कोपरगाव विजय कापसे दि ७ सप्टेंबर २०२४–कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे.ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी आलेल्या नागरीकांना जीव मुठीत घेऊन खरेदी करावी लागते आहे.गणेश चतुर्थीनिमित्त शहरात गणेश मूर्ती आणि साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरीकांना काही मोकाट जनावरांच्या झुंजी वर्दळीच्या ठिकाणी सुरू असल्याने अनेक काळ त्रास सहन करावा लागला आहे. काही नागरीकांना इजा होऊन वाहनांची तोडफोड झाली असल्याची बाब घडल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होतो आहे.या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी जनतेत तीव्र भावना उमटत आहे त्याची दखल घ्यावी व कार्यवाही करावी अशी प्रतिक्रिया सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली आहे.
कायदा सुव्यववस्था आणि नागरिक सुविधा यांच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला तर जनतेला त्याचे तोटे सहन करावे लागतात.शहरात असे विविध समस्यांचे ढीग साचले आहे.मोकाट जनावरे सकाळी मुख्य रस्ते अडवून ठेवतात तर जवळ जाणाऱ्या नागरीकांना जीवाचा धोका यामुळे निर्माण होतो.जंगली हिंस्र प्राण्यांप्रमाणे धसका नागरिकांनी या प्रकाराचा घेतला आहे.
लहान मुले,महिला मोठ्या संख्येने खरेदीसाठी या काळात घराबाहेर पडत असतात.रस्त्यांची दुरावस्थेतून प्रवास करत असताना खड्डे हुकवावे की मोकाट जनावरे मध्यरस्त्यात असताना त्यांच्या धक्क्यापासून संरक्षण करायचे यात अनेकांची धांदल उडते. सण उत्सवाच्या काळात प्रशासन आणि जबाबदार घटकांनी अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांना त्रास होऊ शकतो याचे भान ठेवून वेळीच पावले उचलली पाहिजे होती.काही दिवसांपूर्वी भाजपा,शिवसेना (उध्दव ठाकरे गट),आर पी आय यासह नागरिकांनी पालिका प्रशासनाला अशा समस्या अवगत केल्या होत्या पण तरीही अद्याप कार्यवाही न झाल्याने शहर समस्यांनी वेढले जाते आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी व सायंकाळी शहरात पायी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांना रस्त्यात मोकाट जनावरांचा सामना करावा लागतो त्यामुळे हातात काठी घेऊन बरेच नागरिक फिरताना आढळतात.अशीच स्थिती असल्याने ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी,महिला भगिनी,व्यापारी,नोकरदार सर्वांना या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे.