आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातून उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती – राधाकृष्ण विखे पाटील
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातून उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती – राधाकृष्ण विखे पाटील
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या २४ प्रशिक्षण केंद्राची सुरुवात
शिर्डी विजय कापसे दि २१ सप्टेंबर २०२४- आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या एक हजार प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या २४ प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. दुरदृश्य प्रणालीतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.विखे पाटील म्हणाले, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची सुरुवात खूप महत्त्वपूर्ण असून या योजनेत ३७ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज दोन तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. याउलट संस्थेच्यावतीने ६ हजार रुपयांचे मानधन प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आता औद्योगिक गुंतवणूक येत आहे. येणाऱ्या उद्योजकांना मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. स्थानिक प्रशिक्षीत तरुण त्यांना मिळाले तर रोजगाराच्या संधी मिळतील. शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, दोन हजार युवकांना यामध्ये रोजगार मिळेल. आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षणासाठी २४ केंद्र सुरू करणारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही राज्यातील एकमेव ठरली आहे. असे श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसीत भारत घडविण्यासाठी देशातील युवा शक्तीचे योगदान खूप मोलाचे ठरणार आहे. त्यामुळेच नव्या पिढीच्या भविष्याच्यादृष्टीने ही कौशल्य विकास केंद्रे दिशादर्शक ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.