गौतमच्या रणरागिनींनी केला जिल्हा सर जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा जिंकली
गौतमच्या रणरागिनींनी केला जिल्हा सर जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा जिंकली
गौतमच्या रणरागिनींनी केला जिल्हा सर जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा जिंकली
कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४ :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्रीरामपूर येथे दिनांक २७ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान पार पडल्या. सदर स्पर्धेत खेळताना कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व सक्षमपणे केले. सर्व कोपरगावकरांना अभिमान वाटावा अशा नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करून गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने सदर स्पर्धा जिंकली. स्पर्धेत खेळताना गौतमच्या या विजयी संघाने उपांत्यपूर्व सामन्यात डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल, राहुरी तालुका संघाचा सरळ सेट मध्ये १५-०९, १५-७ असा पराभव केला; तर उपांत्य सामन्यात रामराव आदिक पब्लिक स्कूल, श्रीरामपूर तालुका संघास सरळ सेट मध्ये २५-१२, २५-२३ असे नमवले. स्पर्धेच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूल, कोपरगाव तालुका संघाने दाढ स्कूल, राहता तालुका संघाचा सरळ सेटमध्ये २५-१०, २५-१४ असा पराभव करून जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा जिंकली.
गौतम पब्लिक स्कूलचा हा विजयी व्हॉलीबॉल संघ दिनांक २९ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. गौतम पब्लिक स्कूलच्या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार पूजा गांगुर्डे व उप-कर्णधार वैष्णवी पवार यांनी केले. संघातील स्टार खेळाडू पूजा गांगुर्डे, वैष्णवी पवार, प्रियंका पोलगार, आर्या महागावकर, श्रद्धा गायके, दर्शना मुरडनर ह्या खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव व इसाक सय्यद, क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांनी विजयी धडे दिले.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी विजयी संघाचे अभिनंदन करताना सांगितले की, गौतम पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असून मुला-मुलींसाठी शालेय शिक्षणाबरोबरच विविध मैदानी खेळ, बौद्धिक स्पर्धा यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा गौतम पब्लिक स्कूलमध्ये निर्माण करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.