सोमय्या महाविद्यालयात वांग्मय मंडळाचे उद्घाटन
सोमय्या महाविद्यालयात वांग्मय मंडळाचे उद्घाटन
सोमय्या महाविद्यालयात वांग्मय मंडळाचे उद्घाटन
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२४– साहित्य हे मानवी मनाचे खाद्य आहे सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी वाङ्मयाची नितांत गरज आहे. माणसाला जोडणारे वांग्मय हे खरे वांग्मय, त्याचप्रमाणे माणसांना जोडणारे ग्रंथच खरे ग्रंथ होत. अशा श्रेष्ठ वाङ्मयाचे सृजन आणि जतन व्हावे ही या प्रसंगी प्रांजळ अपेक्षा व्यक्त करतो,” असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि कवी-गायक शरद शेजवळ यांनी कोपरगाव येथील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे अध्यक्षस्थानी होते.
श्री. शेजवळ आपल्या प्रबोधनपर व्याख्यानात पुढे म्हणाले की, “कालच केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, ही समस्त मराठी जनाच्या दृष्टीने अभिमानाची आणि आनंदाचीच बाब होय. परंतु यासोबत वाढत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मरणासन्न अवस्थेतील मराठी माध्यमाच्या शाळांच्या विकासाच्या बाबतीत देखील शासनाने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. ” श्री शेजवळ यांनी लोककवी वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रबोधनपर रचना आपल्या सुरेल आवाजात सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “मराठी आणि एकूणच भारतीय साहित्याला अनेक शतकांची परंपरा आहे. महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदी संतांचे साहित्य आणि एकूणच सामाजिक क्षेत्रातील योगदान शब्दातीत आहे. आधुनिक काळातील साहित्य देखील खूप समृद्ध आहे. विद्यार्थ्यांनी काही काळ मोबाईल बाजूला ठेवून ते वाचावे स्वतःला समृद्ध करावे. ” कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय करून देताना वांग्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी विद्यार्थीदशेत साहित्याचे महत्त्व प्रतिपादित करून कार्यक्रमाचा उद्देश कथन केला.
याप्रसंगी राष्ट्रभाषा सेवा मंच, कोपरगाव च्या वतीने ‘हिंदी दिना’निमित्त आयोजित विचार प्रस्तुतीकरण स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. वांग्मय मंडळाचे सदस्य डॉ. एम. बी. खोसे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर डॉ. रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रा. रावसाहेब गायकवाड, प्रा. संपत आहेर, श्री. रोहित लकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.