लाखो कुटुंबांना रोजगार देणाऱ्या रतन टाटा यांचे कार्य अजरामर
कोपरगाव विजय कापसे दि १० ऑक्टोबर २०२४– जागतिक उद्योगमहर्षी व भारताचे सुपुत्र रतन टाटा यांनी औद्योगिक क्षेत्रांत जी क्रांती केली त्यामुळे अनेकांना रोजगार निर्माण झाला त्यांच्या निधनाने उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा हीच तमाम भारतवासी यांचे वतीने खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगांव औद्योगिक वसाहत व कोपरगावकरांच्या वतीने अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.
ते पुढे म्हणाले की, मिठापासून ते अवकाशात धावणाऱ्या विमानापर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने निर्माण करत टाटा उद्योग समुहाने आपले औद्योगिक वैशिष्ट्य जोपासले त्यामुळे टाटा उद्योग समूह, रतन टाटा हे नाव जागतिक स्तरावर अग्रमानांकित होते. आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात टाटा उद्योग समूहाने विशेष भरारी घेतलेली आहे. गोरगरिबांच्या रोजगाराचे मसीहा म्हणून ते सर्वांना परिचित होते., औद्योगिक क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या नव उद्योजकांचे ते यशस्वी मार्गदर्शक होते.
रतन टाटा यांनी टाटा समूहाला जागतिक समूहात रूपांतरित करण्यात, भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय विस्तार, नवकल्पना, परोपकार आणि नैतिक व्यवसाय पद्धतींपर्यंत विस्तारले, ज्यामुळे कॉर्पोरेट भारत आणि समाज या दोघांवरही कायमचा प्रभाव पडला.
अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी टाटा उद्योग समुहाची धुरा सांभळत ग्रामीण भागातील खेडे – वाड्या-वस्त्यांपर्यंत टाटा हे नांव लोकप्रिय केले. औद्योगिक क्रांती मधील अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. त्यांच्या जाण्याने औद्योगिक क्षेत्रांत आधुनिकीकरणांसह नाविन्यपूर्ण कल्पनांची मोठी हानी झाली आहे. शिस्त, साधेपणा, वेळेला महत्व, कामगार बांधवांची काळजी आणि औद्योगिकीकरणांत वेगळेपण जपणारा माणुस म्हणजे रतन टाटा होते; तेव्हा या महान व्यक्तीमत्वांस भारतदेशाने मरणोत्तर भारतरत्न देऊन एक आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिल्यास १४० कोटी भारतवासियांच्या वतीने ती खरी आदरांजली ठरणार आहे असे विवेक भैय्या कोल्हे शेवटी म्हणाले.
o
संजीवनी उद्योग समुह,औद्योगीक वसाहत,संजीवनी युवा प्रतिष्ठान सर्वांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.