विकासकामांमुळे शिर्डी व परिसरातील १५ हजार युवकांना रोजगार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
विकासकामांमुळे शिर्डी व परिसरातील १५ हजार युवकांना रोजगार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राहाता तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
शिर्डी विजय कापसे दि १२ ऑक्टोबर २०२४ :– शिर्डी एमआयडीसी, साईबाबा थीम पार्क, सावळी विहीर पशुवैद्यकीय महाविद्यालय व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरण या विकासकामांमुळे शिर्डी व परिसरातील १५ हजार युवकांना नवीन रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता तालुक्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे तसेच कैलास सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, महिलांना जीवनात नवी उभारी देण्याचे काम शासनाने केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याच्या लाभाची रक्कम महिलांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.
शासन आजपर्यंत सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवत काम करत आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत महाराष्ट्रातील ४३ लाख शेतकऱ्यांचे वीज देयक माफ करण्यात आले आहे. मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उच्च शिक्षण मोफत करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी योजना राबविण्यात येत आहेत.
राहाता तालुक्यात एक रूपयात पीक विमा योजनेत ८७ हजार शेतकऱ्यांना १२२ कोटीं रूपयांचे वितरण करण्यात आले. सोयाबीन अनुदानाचे ३८ हजार शेतकऱ्यांना १० कोटी रूपये देण्यात आले आहे. राहाता नगरपरिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या मध्यामातून २० कोटींचा निधी देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शासनाने तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वर्ग २ च्या जमीन वर्ग १ विनाशुल्क केल्या आहेत. सावळीविहीरला नवीन एमआयडीसीसाठी ५०० एकर जमीन मोफत देण्यात आली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचे भाषण झाले.
गोदावरी उजवा तट कालवा रुंदीकरण, विस्तारीकरण कामांसाठी १९१ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल कालवा लाभार्थी शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पालकमंत्र्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते राहाता पोलीस स्टेशन मुख्यालय, पोलीस वसाहतीचे भूमिपूजन करण्यात आले. राहाता नगरपरिषद हद्दीतील २१ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. कोवीडने मृत्यू झालेले पाणीपुरवठा कर्मचारी सुनील नामदेव गांगुर्डे यांच्या वारसांना ५० लाखांचा धनादेश वितरीत करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात ५ बचतगटांच्या महिलांना इलेक्ट्रॉनिक गिरणीचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. एका लाभार्थ्यांस प्रातिनिधिक स्वरूपात बांधकाम साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. पीएम स्वनिधी योजनेच्या सहा लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. राहाता व पिंपळस येथील भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक वैभव लोंढे यांनी केले.