कोपरगाव शहरालगत होणार एमआयडीसी -आ.आशुतोष काळे; महसूलमंत्री ना.विखे पाटील देणार विनामुल्य ४३३ एकर जागा
कोपरगाव शहरालगत होणार एमआयडीसी -आ.आशुतोष काळे; महसूलमंत्री ना.विखे पाटील देणार विनामुल्य ४३३ एकर जागा
कोपरगावला एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेतो – उद्योगमंत्री ना. सामंत
कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑक्टोबर २०२४ :- कोपरगाव शहरानजीक असलेली जमिन एमआयडीसीकडे वर्ग करून उद्योग व्यवसाय सुरु करावेत अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली असता महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीसाठी ४३३ एकर जागा विनामुल्य देण्याची जाहीर घोषणा करून उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी देखील एमआयडीसी उभारण्याला हिरवा कंदील देवून कोपरगावला एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे जाहीरपणे सांगितले असून कोपरगाव शहरालगत असणाऱ्या ४३३ एकर जागेवर एमआयडीसी होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
शनिवार (दि.१२) रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावळीविहिर-सोनेवाडी शिवारात होणाऱ्या शिर्डी एम.आय.डी.सी. व डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन समारंभ महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचा लेखाजोखा मांडतांना उद्योग व्यवसायाच्या देखील समस्या मांडून त्यांनी कोपरगाव मतदार संघातील मूलभूत सुविधा बरोबरच रोजगार निर्मिती व व्यावसायिकांना चांगल्या सुविधा मिळून मोठे उत्पादन वाढीसाठी जागा कमी पडत असल्याचे उपस्थित मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना सोयी सुविधा उपलब्ध होत नसून या समस्या सोडविण्यासाठी कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची ७१.७५ हेक्टर, डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्मचे मालकीची ८६.४० हेक्टर व अॅग्रीकल्चर कोपरगांव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मचे मालकीची १५.१९ हेक्टर अशी एकूण १७३.३४ हेक्टर (४३३ एकर) जागा उपलब्ध असून सदरची जागा एम.आय.डी.सी.कडे वर्ग केल्यास व्यावसायिकांचा जागेचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
हि जागा एम.आय.डी.सी. कडे वर्ग करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असून हि मागणी पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करण्याची घोषणा करावी अशी अपेक्षा उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे व्यक्त केली. त्या मागणीचा धागा पकडून महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी एमआयडीसीसाठी ४३३ एकर जागा विनामुल्य देण्याचे जाहीर करून लवकरच मंजुरी देणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळेंना दिली.त्यामुळे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, महसूल मंत्र्यांनी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मी देखील कोपरगावात एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. हा कोपरगाव मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटल्यामुळे व कोपरगाव शहरात येणाऱ्या बहुतांश रस्त्यांचा विकास झाल्यामुळे कोपरगाव शहरालगत ४३३ एकर जागेवर एमआयडीसी होवून मतदार संघातील रोजगार वाढीचा प्रश्न यानिमित्ताने निकाली काढण्यात आ. आशुतोष काळे यांना यश आले आहे.
एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेतो
आ.आशुतोष काळे लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय हुशार असून ते माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत.कोणत्या वेळी काय मागणी करायची हे त्यांना चांगले माहिती आहे. जागा विखे पाटलांच्या विभागाची आहे, जी मागणी केली आहे ते दोन्ही मंत्री कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महसूलमंत्री ना.विखे साहेबांनी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे त्याठिकाणी कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारण्याची जबाबदारी मी घेतो.- ना.उदयजी सामंत, उद्योगमंत्री