समताच्या यशात गुलाबचंद अग्रवाल यांचा सिंहाचा वाटा – काकासाहेब कोयटे
समताच्या यशात गुलाबचंद अग्रवाल यांचा सिंहाचा वाटा – काकासाहेब कोयटे
कोपरगाव विजय कापसे दि ७ नोव्हेंबर २०२४: समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक यशात गुलाबचंद अग्रवाल यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन ही लाभले. तसेच त्यांनी कोपरगाव शहरात सुट्ट्या चहाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ग्राहक हित जोपासत व्यवसाय वाढविला. प्रामाणिक व्यापारी, ग्राहक हित जोपासणारा व्यापारी अशी ओळख गुलाबचंद व त्यांचे बंधू नारायण अग्रवाल यांनी निर्माण केली. त्यांचे चिरंजीव दिपक अग्रवाल यांनी शेवट पर्यंत आई – वडिलांची सेवा प्रामाणिकपणे केली. त्यामुळे दिपकला ‘आधुनिक श्रावण बाळ’ या नावाने संबोधले पाहिजे. असे मत समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ व श्रेष्ठ संचालक गुलाबचंद खेमचंद अग्रवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली समता परिवाराच्या वतीने वाहण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ग्राहक सेवा, कर्ज वितरण करताना कर्जदाराची पत कशी ओळखावी ? हे आम्ही गुलाब शेठ अग्रवाल यांच्याकडून शिकलो. शांत स्वभाव, दुकानाची आकर्षक सजावट हे त्यांचे गुण नक्कीच आपल्याला त्यांची आठवण करून देतील.
तसेच संचालक अरविंद पटेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समता पतसंस्थेच्या यशात त्यांचा मोलाचे योगदान आहे. तसेच वैयक्तिकपणे त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज आम्ही कोपरगाव शहरात व्यवसाय वाढविलेला आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांपैकी त्यांचा शांत स्वभाव हा गुण प्रत्येकानेच घेतला पाहिजे.
मुख्य कार्यालयाचे ठेव विभाग अधिकारी संजय पारखे व कोपरगाव शाखेचे कर्ज विभागाचे अधिकारी वाल्मिक वाणी यांनी मनोगत व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या वेळी संस्थेचे संचालक जितूभाई शहा, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, कचरू मोकळ, संचालिका सौ. शोभा अशोक दरक आदींसह मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या भावपूर्ण श्रद्धांजलीपर सभेचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीमती उज्वला बोरावके यांनी मानले.