पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी संचालकांचे आवाहन
पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी संचालकांचे आवाहन
पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी संचालकांचे आवाहन

अहिल्यानगर विजय कापसे दि ३० नोव्हेंबर २०२४ :- कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येत आहे.

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्रे जोडावी.

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका पातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये असे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस असेल. जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. नाईकवाडी यांनी केले आहे.




