विखे पाटील परिवाराच्या पाठबळामुळे माझ्या सारखा सामान्य कुटूंबातील युवक यशस्वी लढाई करु शकला- आ.अमोल खताळ पाटील
विखे पाटील परिवाराच्या पाठबळामुळे माझ्या सारखा सामान्य कुटूंबातील युवक यशस्वी लढाई करु शकला- आ.अमोल खताळ पाटील
.खताळ पाटील यांनी प्रवरानगर येथे येवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले
लोणी विजय कापसे दि २ डिसेंबर २०२४- संगमनेर तालुक्यातील माझी निवडणूक जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी असल्याने जनतेने परिवर्तन केल्याचा निर्धार केला होता. निवडणूकीतही मोठ्या प्रमाणात धाकदडपशाही करण्यात आली. माझ्या उमेदवारीला घाबरून माझे फ्लेक्सबोर्ड फाडून दशहत निर्माण करण्यात आली. परंतू केवळ विखे पाटील परिवाराच्या पाठबळामुळे या दशहती विरोधात माझ्या सारखा सामान्य कुटूंबातील युवक यशस्वी लढाई करु शकला. अनेक अदृष्य शक्तींचे योगदानही माझ्या विजयात मोठे असल्याचे प्रतिपादन आ.अमोल खताळ पाटील यांनी केले.
आ.खताळ पाटील यांनी प्रवरानगर येथे येवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात त्यांनी विखे पाटील परिवारासह प्रवरा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा.चेअरमन सतिष ससाणे, यांच्यासह सर्व संचालकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात आ.खताळ म्हणाले की, माझ्या सारख्या ४१ वर्षांच्या युवकाने काही वर्षांपासून तालुक्यातील प्रस्तापितां विरुध्द संघर्ष सुरु केला होता. या संघर्षाला ना.विखे पाटील यांचे पाठबळ मिळाल्यामुळेच सामान्य जनतेला न्याय मिळवून देता आला. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने डॉ.सुजय विखे पाटील यांची उमेदवारी व्हावी यासाठीच सर्व युवकांचा पुढाकार होता. मात्र पक्षिय कारणामुळे ती उमेदवारी होवू शकली नाही. माझ्या सारख्या सामान्य कुटूंबातील युवकाला विखे पाटील यांच्या माध्यमातून ही उमेदवारी करता आली हे मी माझे भाग्य समजतो.
तालुक्यात परिवर्तन व्हावे ही जनतेची इच्छा होती यासाठी अनेकांनी मदत केली. या भागातील अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करुन, मला मदत करण्यासाठी भाग पाडले. तुमच्या सारख्या अनेक अदृष्य शक्ती या निवडणूकीत काम करीत होत्या. सर्वांच्या सहकार्यानेच हा विजय मिळाला असल्याने विखे पाटील परिवार आणि आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी केलेले उपकार मी कधीच विसरु शकत नाही असेही खताळ म्हणाले.
ही निवडणूक मोठ्या दशहतीखाली झाली. झालेला घटनाक्रम हा तुमच्या सर्वांच्या समोर आहे. निवडणूकीत मलाही खुप त्रास झाला. धाक दडपशाही करुन कार्यकर्त्यांना धमकावले जात होते. माझे फ्लेक्सबोर्डही फाडण्यात आले. परंतू न डगमगता या दशहती विरोधात मी लढत राहीलो. या लढाईला आपल्या सर्वांचे पाठबळ मिळाले. भविष्यात आता राजकारण बाजूला ठेवून तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांसाठी काम करायचे आहे. ना.विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची विकास प्रक्रीया पुढे घेवून जाण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.