गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार जाहीर
गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार जाहीर
गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार जाहीर
कोपरगाव विजय कापसे दि ११ डिसेंबर २०२४ :- अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या व मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या ‘गौतम सहकारी बँकेने’ आपल्या कुशल कारभाराच्या जोरावर आजवर अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून गौतम सहकारी बँकेच्या उत्कृष्ट कामागिरीबद्दल बँकिंग फंड्रीयरचा ‘बेस्ट ॲन्युअल रिपोर्ट’ प्रमाणे नागरी सहकारी बँकेच्या गटात ‘बँकिंग फंड्रीयर’ मुंबई या संस्थेचा नागरी सहकारी बँक या कॅटेगरीतील २०२४चा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच या बँकेस २०२४ वर्षातील बॅको अवीज पब्लिकेशन चा नागरी सहकारी बँकामधुन बेस्ट टर्न अराउंड बँक या कॅटेगिरीत बँको ब्लू रिबन’ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे. जानेवारी महिन्यात ‘गौतम सहकारी बँकेला’ लोणावळा येथे पुरस्कार प्रदान करणार असल्याचे बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी सांगितले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक स्व.माजी खा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी ‘गौतम सहकारी बँकेची’ स्थापना केली. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी व्यवसायिक, गरजू नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य गरीब कुटुंबापासून तर शेतकरी वर्गापर्यंत सर्वच नागरिकांना गौतम सहकारी बँकेच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला. ‘गौतम सहकारी बँकेची’ स्थापना केल्या पासून बँकेच्या कारभारात काटकसरीचा पायंडा पाडून बँकेस आर्थिक शिस्त लावलेली आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आदर्शवादी विचारावर माजी आ.अशोकराव काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्वक मार्गदर्शनाखाली आ.आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ अतिशय कुशलतेने व एकाग्रतेने बँकेचा कारभार पाहत आहेत. या कार्यकुशलतेमुळे बँकेने ग्राहकांचा विश्वास जिंकला असून बँकिंग क्षेत्रातील आदर्श नागरी बँक म्हणून महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ध्येय धोरणावर ‘गौतम सहकारी बँक’ बॅकींग क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. बँकेला अनेक पुरस्कार मिळालेले असून बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. यामुळे गौतम सहकारी बँकेचा दर्जा हा उंचावलेला आहे ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी ही ग्रामीण भागातील पहिली बँक आहे. १०० ते ५०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या गटातून बँकेस हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा. आ.अशोकराव काळे,आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन, व्हॉ. चेअरमन व सर्व संचालक मंडळासह कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.