ध्यान हाच विश्वशांतीचा एकमेव राजमार्ग – संत परमानंद महाराज
ध्यान हाच विश्वशांतीचा एकमेव राजमार्ग – संत परमानंद महाराज
ध्यान हाच विश्वशांतीचा एकमेव राजमार्ग – संत परमानंद महाराज
कोपरगाव विजय कापसे दि २० डिसेंबर २०२४: ध्यान म्हणजे आत्म्यावर प्रेम करणे होय. ८४ लक्ष योनीतून गेल्या नंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि हा मनुष्य जन्म आपल्याला फक्त संपत्ती, संतती, प्रतिष्ठा आणि आरोग्यसंपदा प्राप्त करण्यासाठी मिळालेला नसून तो आपल्याला आपल्या हृदयातील खऱ्या स्वरुपाची म्हणजेच आत्मस्वरुपाची ओळख व्हावी म्हणून मिळालेला आहे. संपत्ती, प्रतिष्ठा आपल्याला आनंद देतात. परंतू तो आनंद क्षणिक असतो. त्यापासून मिळणारा आनंद हा केवळ एक दिखावा असतो. त्यापासून आपल्याला दुःख आणि चिंताच मिळते. परंतू, आपल्याला जर शाश्वत आनंद मिळवायचा असेल तर, तो ध्यानातूनच शक्य आहे. ध्यानामुळे मिळालेला आनंद हा कधीही न संपणारा असतो. आजचे आपले आयुष्य शाश्वत नाही कारण ते बाह्य जगाच्या अधीन आहे. आपण जर ध्यानाने आपल्या आत्म्याला जाणवून घेण्याचा प्रयत्न केला तर, आपण ही संतांसारखे विमुक्त होऊ. अस्तित्व म्हणजे आपले शरीर नाही तर आत्मा आहे. आपल्या सर्व क्रिया ह्या आत्म्यामुळेच ठरतात.
आत्मा हा जिवंतपणाचा झरा आहे. जर आत्मा नसेल तर शरीरात जीवंतपणा राहत नाही. म्हणून ध्यानाद्वारे आत्मा जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या मानवी जन्माचे खरे स्वरुप हे बाहेरुन दिसणारे शरीर नसून त्या शरीराच्या आत नांदणारा आत्मा हा आहे. आत्म्याच्या अस्तित्वामुळेच आपल्या देहातील सर्व क्रिया सुरुळीत चालतात..
निराकार आत्म्याने अनेक देवीदेवतांच्या रुपात अवतार धारण केलेला आहे. देवळांमध्ये या सर्व देवी-देवतांच्या मुर्त्या आहेत. परंतू खरा देव म्हणजेच आत्मा हा देहरुपी मंदीरात निवास करतो. आत्म्याची अनुभूती व ज्ञान प्राप्त करण्यासाठी नियमित ध्यान करणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही मंदीर,चर्च,मस्जिद, गुरुद्वारा अथवा प्रार्थना गृहात गेल्यानंतर तेथे डोळे बंद करुन शांत बसा व देवाला (आत्म्याला) हृदयात पाहण्याचा प्रयत्न करा यालाच ध्यान असे म्हणतात.
जगातील वेगवेगळे देश, वेगवेगळे धर्म, जाती, पंथ यात जन्म घेणाऱ्या सर्व व्यक्तींच्या हृदयात एक आत्माच निवास करतो. आत्मा विश्वाचा निर्माता, संचालक, चालक, मालक आहे. म्हणून प.पू. गुरुदेवांनी विश्वात्मक संदेश दिलेला आहे. तो म्हणजे ‘सबका मालिक आत्मा’. परंतू या संदेशाच्या अनुभूतीसाठी सद्गुरुंच्या चरणी आपला भाव समर्पित करुन श्रध्दा ठेवणे गरजेचे आहे. नररुपी जीवन नारायण स्वरुप बनविण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन गरजेचे आहे.
आपण या ध्यानात खोलवर जाऊन आत्म्यासोबत अखंड एकाग्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच ध्यान आपल्याला खऱ्या आनंदाकडे तसेच खऱ्या शांतीकडे घेऊन जाते. आणि जीवन नव्या अर्थाने आपल्याला पाहता येते. म्हणजेच सर्वत्र आत्मतत्वच भरुन उरलेलं आहे हे कळते. सर्व देवी-देवतांनी, ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांच्यापासून ते साईबाबांपर्यंत या सर्वानी एकच क्रिया केली ते म्हणजे ध्यान. आणि म्हणून ते सर्व या सर्वोच्च पदाला अर्थात देव पदाला जाऊन पोहोचले.
स्वानुभूतीतून मिळणारे ज्ञान हेच विश्वातील सर्वात मोठे आणि अव्वल दर्जाचे ज्ञान आहे. जगातील इतर सर्व ज्ञानापेक्षा आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. हे आत्मज्ञान ध्यान अभ्यासाच्या अंती स्वानुभवातूनच प्राप्त होत असते. म्हणून सद्गुरू कृपेने साधकाने आत्मानुभूती प्राप्त करावी. ज्या ज्या भाग्यवतांनी सद्गुरू कृपेने हे आत्मज्ञान प्राप्त केले त्यांनीच आपले जीवन पुजनीय बनवले. अशा ज्ञानी संत मंडळींच्या समोरच विश्वातील इतर सर्व ज्ञानी समर्पित होत असतात.
ज्या प्रमाणे एखादा विद्यार्थी त्याचा मेडीकल कोर्स पूर्ण करण्यासाठी कितीतरी वर्ष अभ्यास, परिश्रम करतो व त्या क्षेत्रातील पूर्ण ज्ञान प्राप्त करुन डॉक्टर बनतो. त्याचप्रमाणे आपणही जर भरपूर वर्ष ध्यान अभ्यास केला तर आपल्याला हे कळते की, आपण नर देह नसून त्याला चालविणारी शक्ती म्हणजेच आत्मा आहोत. हे ज्ञान प्राप्त करण्या हेतू आपण ध्यान केले पाहिजे. म्हणूनच प.पू. सद्गुरू माऊली सर्वांना सांगतात की, त ध्यान करा, साधना करा आणि स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. जर आपण सातत्याने हा ध्यान अभ्यास केला तर आपणही आपले जीवन ईश्वररुप बनवू शकतो. सर्व देवांचा देव आत्मा आहे. म्हणून जर देवाचा शोध घ्यायचा असेल तर तो हृदयातच घेतला पाहिजे. देव तीर्थावरती, देवळामध्ये शोधून मिळणार नाही, कारण तो आपल्याच अंतर्यामी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की “देव पहावयासी गेलो, तेथे देवचि होऊनी ठेलो’”. तुकाराम महाराज देव भेटावा म्हणून भंडारदरा डोंगरावर तप साधनेसाठी गेले. पूर्णत: एकरुप होवून अत्यंत ध्यासाने त्यांनी ही साधना केली. म्हणून त्यांना ईश्वराचे दर्शन आपल्याच ठायी हृदयात झाले. तेव्हा ते म्हणाले “देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना अनुभव आला की मी ज्या देवाला आजपर्यंत शोधत होतो तो माझ्याच अंतर्यामी असून ते माझेच सत्य स्वरुप आहे अर्थात मीच आहे.
संत परमानंद महाराज
ध्यानाचे महत्व
आत्मा म्हणजे आपण स्वतः होय. आपल्या आत असणारी उर्जा म्हणजेच अंतर्यामी विराजमान असणारा देव हा आत्माच आहे. आत्मा हा निराकार आहे. पण आत्मानुभूतीसाठी सुरुवातीला आत्म्याला हृदयात कोणत्याही एका आकारात पाहण्याची गरज असते. तुम्ही सद्गुरुंच्या रुपात त्या निराकाराचे ध्यान करु शकता. आत्मदर्शी सद्गुरु आपल्यातच आत्मरुपाने असून ते ध्यान करुन घेतात. आत्म्याचे अस्तित्व सर्व ठिकाणी आहे. आपला देह हे एक अनमोल किंमतीचे महत्वपूर्ण मंदिर आहे. जर, आपण आपल्या हृदयातील आत्म्याचे ध्यान केले. तर, आपल्याला जाणवते की, आत्मा हा विश्वात्मक आहे. ध्यान हे आत्मापर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा, सहज मार्ग आहे. या अनुभवाने आपल्याला शाश्वत आनंद मिळतो ज्याला आपण सत्चित्त आनंद म्हणतो. आपल्या आंतरात असणाऱ्या विश्वात्मक शक्तीचा स्त्रोत आपण ध्यानामुळेच प्राप्त करु शकतो.
ध्यानामुळे आपण एकाग्रता प्राप्त करु शकतो.
ध्यान अभ्यासामुळेच शास्त्रज्ञांनी आजतागायात अनेक शोध लावलेले आहेत.
ध्यानामुळेच आपल्याला दैवी ज्ञान प्राप्त होते.
ध्यानामुळे निर्णय क्षमता वाढते व सद्विवेक अखंड जागृत राहतो.
ध्यानामुळेच आपण आत्म्याशी एकरुप होऊन जातो.
संत परमानंद महाराज कार्याध्यक्ष, आत्मा मालिक ध्यान योग मिशन, आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण