सुरेगाव अंगणवाडी गटाचे कार्य कौतुकास्पद- गटविकास अधिकारी दळवी
अंगणवाडी बालकांच्या माता पालकांचा आरंभ पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २० डिसेंबर २०२४– एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरेगाव गटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी सुरेगाव गटातील सर्व अंगणवाडी बालकांच्या पालकांकरीता आयोजित केलेल्या आरंभ पालक मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गटातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एकत्र येत बालकांच्या पोषण आरोग्य आणि शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या आरंभ पालक मेळाव्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कोळपेवाडीच्या सरपंच चंद्रकला कोळपे, सुरेगावच्या सरपंच सुमन कोळपे, ग्रामपंचायत सदस्य शितल कोळपे, महिला व बालविकास अधिकारी रूपाली धुमाळ, सुरेगाव गटाच्या पर्यवेक्षिका मीना गावित, उमा खोले, नंदा पंडित, गीता देवगुणे आदि पर्यवेक्षिकासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला बालविकास अधिकारी रूपाली धुमाळ यांनी सांगितले की, आपल्या बालकाच्या सर्वांगांचा विकास होण्यासाठी अंगणवाडी हा महत्त्वाचा भाग असतो आणि याच बालवयात या बालकांना सुदृढ सकस आहार वेळेवर लसीकरण याविषयी आवश्यक ते ज्ञान त्यांचा पालकांना मिळावे याकरिता या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे धुमाळ यांनी सांगत या बालवयात आपल्या पाल्याना मोबाईल पासून दूर ठेवत जास्तीत जात मैदानी खेळावर भर देण्याचे आवाहन केले.
तर या पालक मेळाव्यात उपस्थित सर्व अंगणवाडीच्या चिमुकल्यानी आकर्षक असा रंगबिरंगी पोशाख परिधान करून आपली बालकला सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर, या पालक मेळाव्यात अंगणवाडी सेविकांनी पालकांना आपल्या पाल्यासाठी सकस आहार, हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळे आदी आहाराचे तसेच लसीकरण,बालकात वयानुरूप वाढ होत असताना होणारे शरीरातील बदल व आपल्या बालकाची काळजी कशी घ्यायची,वेगवेगळ्या सोप्या मैदानी खेळाची माहिती प्रात्यक्षिक याविषयी लावलेले माहिती फलक मोठ्या संख्येने उपस्थित माता व पालक तसेच गटविकास अधिकारी दळवी व मान्यवर बारकाईने वाचन करत अंगणवाडी सेविकांचे कौतुक करत होते.
तर पर्यवेक्षिका गावीत यांनी देखील उपस्थित पालकांना बालकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्या विषयी व लसीकरण विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुवर्णा जेऊघाले, सूत्रसंचालन सोनवणे सर तर उपस्थितांचे आभार अंगणवाडी सेविका अश्विनी विनायक वाघ यांनी व्यक्त केले