करंजी गाव गाडी दर दिवशी सुरू ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
करंजी गाव गाडी दर दिवशी सुरू ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
करंजी गाव गाडी दर दिवशी सुरू ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी
कोपरगाव विजय कापसे दि २३ डिसेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या करंजी गावची गावगाडी नियमितपणे वेळेवर दरदिवशी सुरू ठेवावी अशी मागणी करंजी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने कोपरगाव एसटी आगार प्रमुख अमोल बनकर यांना निवेदन देत केली आहे.
करंजी गावचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रवींद्र आगवन व उपसरपंच शिवाजी जाधव यांनी कोपरगाव एसटी आगार प्रमुख बनकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करंजी गावची एसटी बस आगारातर्फे सकाळी १० वाजता व संध्याकाळी ५ वाजता सोमवार ते शनिवार येत असते. रविवारी बसला सुट्टी असते, तर शासकीय व शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीच्या दिवशी करंजी गावगाडी येतच नाही, त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी एसटी बस गावात न आल्याने गावातील ग्रामस्थांची तसेच दवाखान्यात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे आपण यावर गांभीर्यपूर्वक विचार करत आठवड्यातील संपूर्ण दिवस नियमितपणे करंजी गावगाडी पाठवावी तसा ठराव देखील गावच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे, तसे न झाल्यास आपल्या दालनासमोर ग्रामस्थांसोबत ठिय्या आंदोलन करत उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे सरपंच व उपसरपंच यांनी दिला आहे.
नियमितपणे वेळेवर बस मिळावीसकाळी करंजी गावात जुन्या वेळेप्रमाणे म्हणजेच १० वाजता बस यावी व संध्याकाळी ६ वाजता बस यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून जेणेकरून कोपरगाव शहरातील शाळा महाविद्यालय ५ वाजता सुटल्यानंतर करंजी गावच्या विद्यार्थ्यांना घरी येणे सोयीचे होऊ शकते.