गोदाकाठ महोत्सवातून महिला बचत गटांच्या चळवळीला चालना-सौ.पुष्पाताई काळे
गोदाकाठ महोत्सवातून महिला बचत गटांच्या चळवळीला चालना-सौ.पुष्पाताई काळे
नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदी, रोज होत आहे लाखोंची उलाढाल
कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२५:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,कोपरगाव आयोजित गोदाकाठ महोत्सवाच्या तिसर्या दिवशी शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे कोपरगावकरांनी कुटुंबासह खरेदी करण्यासाठी गोदाकाठ महोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तिसऱ्या दिवशी रविवारी गर्दीचा उंच्चांक पहायला मिळाला. महाराष्ट्र राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागातील काना-कोपर्यातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी खाद्य संस्कृतीचे दर्शन घडविले. गोदाकाठ महोत्सवात नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करून बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढविला.त्यामुळे निश्चितपणे महिला बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होवून गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटाच्या चळवळीला चालना देण्याचे काम इमाने इतबारे पार पाडीत असल्याचे सौ.पुष्पाताई काळे यांनी म्हटले आहे.
गोदाकाठ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आपली घरगुती उत्पादने विक्रीस आणणाऱ्या बचत गटाच्या महिलांचा सौ.पुष्पाताई काळे यांच्या उपस्थितीत आ.आशुतोष काळे यांनी प्रमाणपत्र देवून सत्कार केला. महिलांना आर्थिक हातभार मिळावा व त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर होवून महिलांच्या काळजी दूर व्हाव्यात या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गोदाकाठ महोत्सवात यावर्षी बचत गटांच्या महिलांनी घरगुती तयार केलेल्या मालाची अनेक दुकाने थाटली आहे. यामध्ये गृह उपयोगी वस्तु, मसाले, पापड, लोणची, शोभेच्या वस्तू, खाद्य पदार्थांचे विविध प्रकार ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी गोदाकाठ महोत्सवात येणारे नागरिक दुसऱ्या दिवशी येण्याचा मोह आवरू शकले नाही. चार दिवस चालणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाची तीन दिवसात लाखोंची उलाढाल होत असून महोत्सवाचा एक दिवस बाकी आहे त्यामुळे जवळपास दीड कोटीच्या वर उलाढाल होणार असल्याचा अंदाज बचत गटाच्या महिलांनी आपल्या तीन दिवसात झालेल्या व्यवसायाच्या आकडेवारीवरून दिसून येत असल्याचे सांगितले.
विविध वस्तू,साहित्य खरेदी करण्यासाठी व खाद्य पदार्थाचा आस्वाद घेण्यसाठी नागरिकांच्या झालेल्या तोबा गर्दीमुळे महोत्सवातील सर्व दुकाने ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती. ग्राहकांचा खरेदी करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद व उत्साह पाहता बचत गटांच्या महिलांनी विविध प्रकारच्या वस्तु व खाद्य पदार्थांची जास्तीत जास्त विक्री झाली.त्यामुळे त्यांच्या कष्टांना प्रोत्साहन व त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे करण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असल्याचे सौ.पुष्पाताई काळे यांनी म्हटले आहे.