ए. आय. च्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध होणार-पोलिस निरीक्षक संदीप कोळी

ए. आय. च्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध होणार-पोलिस निरीक्षक संदीप कोळी
रोबोटिक उत्क्रांतीत सर्वांचा सहभाग महत्वाचा- पोलिस निरीक्षक संदिप कोळी

कोपरगाव विजय कापसे दि २३ जानेवारी २०२५- विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात रोबोटिक उत्क्रांती होते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञान युगात सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव महाविद्यालय, द बॉम्बे मदर्स अॅन्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी, राजगुरुनगर व सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक शिक्षण घेणा-या अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती चे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचेसाठी ए. आय. आणि रोबोटिक या विषयावर तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांनी आपल्या मनोगतात ए. आय. च्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध होणार आहे. सायबर युगात अवगत तंत्रज्ञानाचा सदुपयोग करा. दुरुपयोग झाला तर कडक शासन होणार असल्याचे आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव सरोदे यांनी, “ए.आय.तंत्रज्ञान हे चारशे वर्षापेक्षा जास्त जुने आहे. काळानुरुप तंत्रज्ञानाचा सहाय्याने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थांना प्रशिक्षणाच्या मिळालेल्या संधीचे सोनं करतील असे आवर्जून सांगितले.

या प्रसंगी सुशांत घोडके (सूर्यतेज संस्थापक व स्वच्छता दूत), सुभेदार मारुतीराव कोपरे, खिंवराज दुशिंग (सेवा निवृत्त नायब तहसीलदार), विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मोहन सांगळे, उपप्राचार्य संजय शिंदे, प्रा. सागर खोडदे (प्रशिक्षक), प्रा. पिनाक राबरी, एकनाथ कळमकर (पर्यवेक्षक, कार्यशाळा अधिकारी) आदींसह महाविद्यालय शिक्षक, शिक्षिका आणि १५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे यांनी केले
