के. जे. सोमैया महाविद्यालयात भूगोल दिन विविध उपक्रमांनी साजरा

के. जे. सोमैया महाविद्यालयात भूगोल दिन विविध उपक्रमांनी साजरा
के. जे. सोमैया महाविद्यालयात भूगोल दिन विविध उपक्रमांनी साजरा

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२५– कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने दि. २७ जानेवारी २०२५ रोजी भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भूगोलाची ओळख व व्याप्ती या विषयवार मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले महाविद्यालय, पिंपळगाव पिसा येथील भूगोल विभागप्रमुख प्रा. बी. डी. वाघमारे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मानवी जीवनातील भूगोलाचे महत्त्व विशद करताना पृथ्वी व भूगोल यांचा आंतरिक सहसंबंध विविध उदाहरणांच्या माध्यमातून विशद केला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी भूगोल विभागाच्या वतीने वर्षभर राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक करतानांच भूगोल विषयाचे महत्त्व, भौगोलिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना तसेच गॅलिलिओ या शास्त्रज्ञाचे तत्त्वज्ञान यावर सखोल भाष्य केले. डॉ. वसुदेव साळुंके यांनी ‘खगोलशास्त्र’ विषयावर प्रकाश टाकला. तर विभागप्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांनी भूगोल विषयातील तंत्रज्ञान व काळाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भूगोल विभागाच्या वतीने यावेळी विविध भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. भूगोल दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री लकारे व वैशाली धनराव यांनी केले तर आभार प्रदर्शन फयाज शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.