आपला जिल्हा
उषाताईचे यश समाजासाठी प्रेरणादायी-डॉ परशराम साबळे
उषाताईचे यश समाजासाठी प्रेरणादायी-डॉ परशराम साबळे
उषाताईचे यश समाजासाठी प्रेरणादायी-डॉ परशराम साबळे

कोपरगाव विजय कापसे दि १ नोव्हेंबर २०२५–एका सफाई कर्मचारी अहिल्याबाई या महिलेची मुलगी तसेच रस्त्यावर बसून चप्पल बूट पॉलिश करणारे ज्ञानेश्वर पवार यांची लहान बहीण उषा पवार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेले घवघवीत यश हे नक्कीच समाजातील सर्व युवक युवतींना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशरम साबळे यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील सुभाष नगर येथील उषा गंगाधर पवार या मुलीने आपल्या परिस्थितीवर मात करत वडिलांचे छत्र डोक्यावरून गेल्यानंतर आपली आई व मोठा भाऊ हे करत असलेल्या अपार कष्टाची जाण ठेवत लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे स्वप्न उराशी बाळगत जिद्दीने अभ्यास करत आज तिने तिचे स्वप्न सत्यात आणत कोपरगाव तालुक्यासह किंबहुना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम महिला पोलीस अधीक्षक होण्याचा मान ती मिळू शकणार आहे हे नक्कीच समाजासह कोपरगावकरांसाठी कौतुकास्पद बाब आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण कोपरगाव मध्ये मोठ्या जल्लोषात तिची मिरवणूक काढण्यात आली तर आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशरम साबळे यांच्या सह कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विशाल धारणगावकर, बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा विजय कापसे,प्रा जनार्दन सुपेकर, निलेश देवकर आदींनी तिच्या कोपरगाव शहरातील राहत्या घरी जाऊन तिचे तिच्या आईचे व तिच्या भावाचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी तिच्या आई व भावाला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते.




