गौतम बँकेच्या कर्जदाराने कर्ज थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्यामुळे कर्जदारास कारावास व दंड

गौतम बँकेच्या कर्जदाराने कर्ज थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्यामुळे कर्जदारास कारावास व दंड
गौतम बँकेच्या कर्जदाराने कर्ज थकबाकी पोटी दिलेला चेक न वटल्यामुळे कर्जदारास कारावास व दंड

कोपरगाव विजय कापसे दि १४ फेब्रुवारी २०२५ :- कोपरगाव तालुक्यातील सहकारी बँकेत अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या कर्जदाराने थकीत कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सदर कर्जदारास कर्जाची रक्कम रुपये तीन लाख बँकेला अदा करण्याबरोबरच सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गौतम बँकेचे चासनळी येथील कर्जदार धनंजय नरहरी गाडे यांचे कर्ज थकले होते. सदरच्या कर्जाची थकीत रक्कम भरावी यासाठी बँक वसुली प्रशासन त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठ्पुराव्यातून कर्जदार धनंजय गाडे यांनी बँकेस कर्जाच्या रक्कमेचा धनादेश दिला होता. परंतु धनादेश दिलेल्या बँक खात्यात धनादेशाची रक्कम शिल्लक नसल्यामुळे सदरचा चेक वटला नाही. त्याबद्दल कर्जदार यांना बँक वसुली प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेत थकीत कर्जबाकी भरण्यास विनंती करूनही कर्जदार धनंजय गाडे यांनी थकीत कर्जबाकी न भरली नाही. त्यामुळे बँकेने नाईलाजास्तव कर्जदार धनंजय गाडे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आणि न्यायालयात प्रकरण दाखल केले.

त्यामुळे कर्ज थकबाकी पोटी दिलेला चेक न वटता परत आल्याने त्याच्या विरूद्ध निगोसिऍबल इन्स्टिमेट अॅक्ट चे कलम १३८ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर केस बाबत कोपरगाव येथिल वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायमुर्ती बी. डी. पंडीत यांचे समोर सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेवून न्यायमुर्ती बी.डी.पंडीत यांनी कर्जदार धनंजय नरहरी गाडे यांना ३ लाख रुपये बँकेत भरण्याचा व त्याचबरोबर सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वसुली अधिकारी विष्णू होन यांनी वसुलीसाठी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे कर्ज थकबाकीची समस्या कमी होण्यास मदत होवून अन्य कर्जदारांनाही आपले कर्ज हफ्ते वेळेत भरण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. ज्या कर्जदारांकडे कर्ज थकबाकी असतील त्यांनी वसुलीपोटी धनादेश देतांना काळजी घेवून अशा कायदेशीर कारवाईला सामोरे जावू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी केले आहे.

गौतम बँकेने सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा मोठा विश्वास कमविला आहे. त्यामुळे सभासद व ठेविदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे हे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक कर्जदाराने घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा व घेतलेल्या कर्जातून आपल्या आर्थिक अडचणी दूर करून बँकेचे कर्ज हफ्ते वेळेत भरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बँक प्रशासनाचे काम सोपे होवून जास्तीत जास्त पात्र गरजू नागरिकांना कर्ज देणे सोपे होईल.- प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड.