गावठी कट्ट्यासह कोपरगावात आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
गावठी कट्ट्यासह कोपरगावात आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
गावठी कट्ट्यासह कोपरगावात आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

कोपरगाव विजय कापसे दि २३ मार्च २०२५– अवैध शस्त्रसाठ्याचा वाढता धोका आणि पोलिसांची सतर्कता याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगावमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गुन्ह्याला अटकाव बसला असून, शहराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून अभिषेक उदयनारायण सिंग (वय २३, रा. टाकळी नाका, निवारा कॉर्नर, कोपरगाव) याला अटक केली. झडतीदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ३०,००० रुपयांचे गावठी पिस्तूल आणि २०० रुपयांचे जिवंत काडतूस जप्त केले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांत कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी तलवारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यावर मोठी कारवाई केली होती. आता गावठी पिस्तुलांचे प्रकरण उघडकीस आल्याने एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे

प्राथमिक चौकशीत आरोपीकडून हे शस्त्र कुठून मिळवले, कोणत्या उद्देशाने बाळगले होते यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी विशेष पथक नेमून अवैध शस्त्रसाठ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “पोलिसांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शहरात शांतता राखावी,” अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून शहरात अवैध शस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलली जातील, अशी शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कसा जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



