आमदार काळें वरील सर्व आरोप बिन बुडाचे-काळे गट
आमदार काळें वरील सर्व आरोप बिन बुडाचे-काळे गट
विवेक कोल्हे यांनी आमदार काळेंवर केलेल्या आरोपांना काळें गटाकडून जोरदार प्रतिउत्तर

कोपरगाव विजय कापसे दि ९ नोव्हेंबर २०२५– शनिवारी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार आशुतोष काळे यांच्यावर केलेले सर्व आरोप बिन बुडाचे असल्याचा जोरदार पलटवार काळे गटाचे मंदार पहाडे, विरण बोरावके, कृष्णा आढाव व सुनील गंगुले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केला आहे.

या पत्रकार परिषदेत मंदार पहाडे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून आमदार काळे यांच्यावर आरोप केले जात आहे. पाणी प्रश्नावर राजकारण करणारे त्यांच्याकडे ४० वर्ष सत्ता असताना शहराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा असलेला पाणी प्रश्न ते का सोडू शकले नाही? ५ नंबर तळ्याच्या निर्मितीला खोडा कोणी घातला? हे जनतेला माहिती आहे त्यामुळे तळ्याचे अर्धवट काम लवकरच पूर्ण होऊन दादांनी १ ते २ दिवसात पाणी देण्याचा दिलेला शब्द लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगत शहरातील स्विमिंग पूल कोणी खाल्ला? साईगाव पालखी रस्ता कोणी खाल्ला? एसटी स्टँडचे नियोजन शून्य काम करत त्याचे निकृष्ट काम कोणी केले? शहरात निकृष्ट काम करणारे ठेकेदार कोण? हे सर्व माहीत असताना देखील आमदार काळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात हे सर्व निंदनीय असून आम्ही या सर्वांचा जाहीर निषेध करतो असे मंदार पहाडे यांनी सांगितले.

तर विरेन बोरावके यांनी सांगितले की, कोपरगावात कोणतेही दृश्य स्वरूपातील काम झालेले नाहीत असा आरोप आमदार काळे वर केला जात आहे, अहो ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत, ग्रामीण पोलीस स्टेशन वसाहत, उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती, दिवाणी न्यायालयाची इमारत, न्यायाधीश निवासस्थान असे कितीतरी दृश्य स्वरूपातील कामे आहे की ज्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहेतच त्यासोबतच व्यापारी व नव उद्योजकांच्या दृष्टीने ३ व्यापारी संकुलांची कामे प्रगतीपथावर आहे तर एकाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. तसेच कोपरगाव नगरपालिका इमारतीत व शासकीय आयटीआय कॉलेजच्या इमारतीत आवश्यक ते फर्निचर व साहित्य साठी निधीची उपलब्धता करून दिली आहे तर शहरातील वेगवेगळ्या समाजाच्या मंदिर सभागृहांसाठी देखील मोठा निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आमदार काळेंवर आरोप करणे हे चुकीचे असल्याचे बोरावके यांनी सांगत जनता त्यांच्या भुलथापाना कधीही बळी पडणार नाही असा विश्वास बोरावके यांनी व्यक्त केला.

कृष्णा आढाव यांनी सांगितले की, शहरात कोणत्याही सामाजिक सभागृहाला काळेंनी निधी दिला नाही असा आरोप केला अहो सभागृहास निधी देण्याची प्रथा माजी आमदार अशोक काळे यांनी सुरू करत तीच प्रथा आमदार आशुतोष काळे यांनी सुरू ठेवत शहरासह तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या सभागृहांना भरघोस निधी दिला आहे त्यामुळे बिन बुडाचे आरोप आमदार काळेंवर करण्यापेक्षा अभ्यास करून आरोप करावे असा उपरोधिक सल्ला आढाव यांनी विवेक कोल्हे यांना देत जनता आता पूर्णपणे सुज्ञ झाले असून आपण करत असलेल्या चुकीच्या अपप्रचाराला कधीच बळी पडणार नसून विकासाची कास धरून आमदार काळे चालले असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या निवडणुकीत आमदार काळे जे उमेदवार देतील त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आढाव यांनी कोपरगावासीयांना केले आहे.





