अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची सिंगापूरस्थित बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट यशात आणखी एक मानाचा तुरा
आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी

संगमनेर विजय कापसे दि १५ जानेवारी २०२६–
सिंगापूरस्थित बहुराष्ट्रीय कंपनी डिजिटल एज डीसी या आघाडीच्या डेटा सेंटर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर येथील चार विद्यार्थ्यांची वार्षिक सुमारे सहा लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. ही कंपनी जगभरात आधुनिक डेटा सेंटर्स उभारण्याचे कार्य करत असून, सध्या मुंबई येथे अमेझॉन कंपनीसाठी डेटा सेंटर प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पासाठी कुशल व तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन डिजिटल एज डीसी कंपनीने अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे, येणाऱ्या काळात या कंपनीकडून आणखी काही विद्यार्थ्यांची भरती होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली.

जगभरात सध्या रोजगाराच्या संधी मर्यादित होत असतानाही, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंट घोडदौड यावर्षीही जोमाने सुरू आहे. आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली. तसेच, येणाऱ्या काळात अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब, पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिलजी शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ. जे. बी. गुरव, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे तसेच प्लेसमेंट विभाग आणि सर्व प्राध्यापकवर्गाने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची ही सातत्यपूर्ण प्लेसमेंट कामगिरी विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि समर्पित मार्गदर्शनाचे यशस्वी फलित असल्याचे स्पष्ट होते.



