अंचलगावच्या सरपंचाकडून पदाचा गैरवापर, जिल्हाधिकाऱ्यांकडून सरपंच पदासह सदस्यत्वही रद्द, कोल्हे गटाला झटका
अंचलगावच्या सरपंचाकडून पदाचा गैरवापर, जिल्हाधिकाऱ्यांकडून सरपंच पदासह सदस्यत्वही रद्द, कोल्हे गटाला झटका
अंचलगावच्या सरपंचाकडून पदाचा गैरवापर, जिल्हाधिकाऱ्यांकडून सरपंच पदासह सदस्यत्वही रद्द, कोल्हे गटाला झटका
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२६– कोपरगाव मतदारसंघातील अंचलगावाच्या सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करून स्वतःचा मुलगा घरकुलासाठी पात्र नसतांना देखील बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे घरकुल मंजूर करून घेतले होते. तसेच सदरचे मंजूर घरकुल सरकारी जागेत अतिक्रमण करत बांधले आहे. याबाबत काळे गटाकडून दादासाहेब बनसोडे व कार्यकर्त्यांनी मा.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचेकडे दाखल केलेल्या तक्रारीची सविस्तर चौकशी केली असता त्यामध्ये अंचलगावच्या सरपंच मंगला खिरडकर ह्या दोषी आढळल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच मंगला खिरडकर यांचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द केले असल्याची माहिती ॲड.एम.यु.(मुन्ना) सय्यद यांनी दिली आहे.त्यामुळे कोल्हे गटाला मोठा झटका बसला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंचलगावाच्या कोल्हे गटाच्या सरपंच मंगला खिरडकर यांच्या कागदोपत्री हिंदू धनगर असा जातीचा उल्लेख आहे. परंतु त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथून हिंदू खाटीक जातीचे बनावट जात प्रमाणपत्र तयार करत सदर घरकुलाचा लाभ तर घेतलाच पण त्याच बरोबर हे घरकुल ग्रामपंचायतच्या अतिक्रमित जागेत बांधले. या कामी सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मुलाला मदत केली होती. त्यामुळे काळे गटाचे दादासाहेब बनसोडे व कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे २०२१ साली अर्ज दाखल करून सरपंच मंगला खिरडकर यांच्या मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट जात प्रमाणपत्र मिळविले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून समाज कल्याण विभागाने सदरचे बनावट प्रमाणपत्र जमा करण्यात येणार असल्याचे तक्रारकर्त्यांना लेखी कळवले होते.

त्यानुसार दादासाहेब बनसोडे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये अहिल्यानगरचे मा.जिल्हाधिकारी यांचेकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करत अंचलगावच्या सरपंच मंगला खिरडकर यांचे सरपंचपद रद्द करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली होती. समाजकल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे काळे गटाचे दादासाहेब बनसोडे यांनी ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल करून सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मुलाला घरकुलाचा लाभ दिल्याचे तसेच अतिक्रमणाच्या जागेवर घरकुल बांधल्याचे पुरावे ॲड.एम. यु.(मुन्ना) सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

सदरच्या तक्रारीची माहिती घेवून सादर केलेल्या कागदपत्रांची व पुराव्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर चौकशी व पडताळणी केली असता तक्रारकर्ते दादासाहेब बनसोडे यांनी दिलेली माहिती खरी असल्याचे सिद्ध झाल्याने मा.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी मंगला खिरडकर यांचे सरपंचपद व त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द करण्याचा निर्णय घेतला असून हा कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.



