येसगाव येथे विद्यार्थी सुरक्षितता व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

येसगाव येथे विद्यार्थी सुरक्षितता व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
येसगाव येथे विद्यार्थी सुरक्षितता व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि. १४ फेब्रुवारी २०२६ ( – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे विद्यार्थी सुरक्षितता व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल भारती,पोलीस उपअधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व,सायबर गुन्ह्यांपासून बचाव, कायदेशीर जाणीवा, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर, तसेच स्वतःच्या हक्क व कर्तव्यांची माहिती सविस्तरपणे देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या डिजिटल वापराच्या पार्श्वभूमीवर सजग नागरिक म्हणून कसे वागावे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची तयारी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास वाढविण्याच्या पद्धती आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुणांविषयी त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या अनुभवातून दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. कार्यक्रमास येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, ॲड. उत्तमराव पाईक, किरण गायकवाड व नानासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका चाबुकस्वार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक जयश्री आंबरे यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या कार्यक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने अमोल भारती साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा प्रकारचे मार्गदर्शन लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.









