संगमनेर नगरपरिषद ला ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार

संगमनेर नगरपरिषद ला ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार

यावेळी मा.उपमुख्यमंत्री ना श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे मा.राज्यपाल आचार्य देवव्रत, पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्यासह संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे व नगरसेवक किशोर टोकसे उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब थोरात मा. आ. डॉ. सुधीर तांबे आणि तत्कालीन नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी पर्यावरणाबाबत संगमनेर नगर परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवले. या कार्यक्रमाची दखल घेऊन संगमनेर नगर परिषदेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले.
हाच वारसा जोपासताना आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाच्या पंचतत्त्वांपैकी भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश यांच्या संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे संगमनेर नगरपरिषदेला हा मान मिळाला आहे. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि प्रदूषण नियंत्रण या क्षेत्रांत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केल्याने संगमनेरने राज्याच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे.
हा पुरस्कार केवळ नगरपरिषदेचा नसून, शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सामूहिक सन्मान असल्याची भावना डॉ.मैथिली तांबे यांनी व्यक्त केली.
संगमनेर नगर परिषदेला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा. आ. डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख सर्व नगरसेवक, नगरसेविका मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अभिनंदन केले आहे.
पर्यावरण संरक्षण ही स्पर्धा नसून आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज मिळालेला हा सन्मान सर्व संगमनेर करांचा असून भविष्यातही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल
– डॉ.मैथिली तांबे




