हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासली संगमनेरची सहकार पंढरी; संगमनेरचा समृद्ध सहकार पाहून विद्यार्थी भारावले

6700 विद्यार्थ्यांनी थोरात कारखाना, दूध संघ, इंजिनिअरिंग कॉलेजला दिली भेट

संगमनेर विजय कापसे दि २२ फेब्रुवारी २०२६- दुष्काळी तालुका ते वैभवशाली तालुका या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या सहकारातील विविध संस्थांची पाहणी व अभ्यास महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनी केला असून या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली सहकार पंढरी ही पुस्तकी ज्ञानाबरोबर त्यांच्या जीवनासाठी महत्त्वाची शिदोरी ठरणार असून माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील विविध संस्था पाहून सर्व विद्यार्थी भारावले.

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराचा राजमार्ग निवडून संगमनेर तालुक्यामध्ये विकासाची पायाभरणी केली. कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, अमृतवाहिनी बँक या विविध सहकारी संस्थांबरोबर गुणवत्तेच्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा मा.कृषी व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा सहकार आज देशाला दिशादर्शक ठरतो आहे. गाव पातळी ते शिखर संस्था याचबरोबर गुणवत्तेच्या शिक्षण संस्था, चाळीस वर्षांचे अविश्रांत काम त्यातून निर्माण झालेली समृद्धी गावागावात आलेल्या विकास, शहरात झालेल्या वैभवशाली इमारती आणि निळवंडे धरण यामुळे संगमनेर तालुका आज राज्यात प्रगतशील म्हणून ओळखला जातो.

या विकासाच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सहकारातील विविध संस्थांना युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून तालुक्यातील 6790 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. शालेय जीवनापासूनच शेती, सहकार चळवळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भेटीमध्ये थोरात सहकारी साखर कारखाना,राजहंस दूध संघ,अमृतवाहिनी सहकारी बँक, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज याचबरोबर विविध सहकारी संस्थांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.

कारखान्यांमध्ये शेतातून आलेला ऊस ते उत्पादित होणारी साखर याचबरोबर अल्कोहोल, वीज निर्मिती ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अभ्यासली याचबरोबर दूध त्यावर होणाऱ्या प्रक्रिया याचबरोबर उप पदार्थांची निर्मिती याचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी केला. सहकाराबरोबर शिक्षणामधील अग्रगण्य असणाऱ्या अमृतवाहिनी मधील इंजिनिअरिंग कॉलेज,पॉलीटेक्निक,एमबीए, फार्मसी,डेंटल कॉलेज या सर्व संस्थांनाही विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
अमृत उद्योग समूहातील हिरवाईचा आणि स्वच्छ परिसर शिस्तबद्ध वातावरण नव्याने उभी राहिलेली कारखान्याची भव्य प्रशासकीय इमारत, अमृतेश्वराचे मंदिर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे प्रेरणास्थळ, अमृतवाहिनीतील बांबूचे बन, दररोज हजारो नागरिकांची होणारी वरदळ, सर्वांचे स्वागत आणि प्रसन्न वातावरण यामुळे सर्व विद्यार्थी या सहकार पंढरीत भारावून गेले.
या सर्व विद्यार्थ्यांनी या भेटी दरम्यान महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख याचबरोबर विविध मान्यवरांशी संवाद साधला.
श्रमिक महाविद्यालय, पानवडी येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल अमृतवाहिनी मधील विविध स्कूल, संगमनेर शहरातील विविध महाविद्यालय या सर्व विद्यार्थ्यांनी विविध संस्थांना भेटी दिल्या.
दुष्काळी तालुका ते विकसित तालुका या परिवर्तनामध्ये सहकार चळवळीने मोठे योगदान दिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू असून सहकारी संस्था,गुणवत्तेच्या शिक्षण संस्था, गाव पातळीवरील संस्था,बाजारपेठ,सुसंस्कृत वातावरण, प्रगतशील शेती, पाईपलाईनचे जाळे, आणि कष्ट करणारा संगमनेरचा शेतकरी या सगळ्यांच्या योगदानातून संगमनेर तालुका उभा राहिला. तालुक्याला मोठी समृद्ध व संस्कृत परंपरा आहे. ही परंपरा जपत तरुण पिढीने विविध क्षेत्रात येणारे नवीन एआय तंत्रज्ञान अभ्यासणे गरजेचे असून चांगल्या गुणवत्तेतून काम करत आपल्या कुटुंबाचा, गावाचा व तालुक्याचा लौकिक वाढवावा असे आवाहन माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.









