सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत विद्यालयाने जिल्ह्याच्या वैभवात भर – पद्मश्री रघुवीर खेडकर

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत विद्यालयाचा शुभारंभ

संगमनेर विजय कापसे दि १८ मार्च २०२६—संगमनेर हे अत्यंत सुसंस्कृत व चांगले गाव आहे. त्यामुळे बाहेरून आलेली अनेक माणसे येथे स्थिरावली आहेत. या भूमीने कायम संत आणि कलावंतांचा आदर केला असून नव्याने सुरू झालेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत विद्यालय हे संगमनेरच्या व जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल असा विश्वास पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नव्याने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय संचलित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा आ डॉ. सुधीर तांबे, न्यायमूर्ती सुमंत कोल्हे, लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, डॉ संतोष खेडलेकर, प्रा. बाबा खरात, ॲड ज्ञानेश्वर सांगळे, सिताराम वर्पे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस एम खेमनर, संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. विनोद राऊत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पद्मश्री रघुवीर खेडकर व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कला दालनाचा शुभारंभ ही करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की माझी आई स्वर्गीय कांताबाई सातारकर यांची संगमनेर मध्ये संगीत विद्यालय असावे ही खूप इच्छा होती. आज संगमनेरच्या सुपुत्राच्या हस्ते या विद्यालयाचा शुभारंभ केल्याचा मला खूप आनंद आहे. संगमनेर हे खूप चांगले गाव आहे. खूप चांगली माणसे येथे आहेत. विविध क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. नेतृत्व खूप चांगले आहे. येथे बाहेरून आलेल्या प्रत्येक माणूस इथेच राहतो. सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या गावांमध्ये नव्याने संगीत विद्यालय सुरू होते आहे. यामुळे संगमनेर आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठी भर पडली आहे.

आपला 53 वर्षांचा प्रवास संगीतासमवेत आहे. अनेक गावांमधून मंदिरे, शाळा, दवाखाना, रस्ते याचबरोबर विविध व्यक्तींच्या आजारांच्या मदतीसाठी आपण काम केले. कधीही जाहिरात केली नाही. तमाशा हा अश्लील नाही. त्याकडे चांगल्या नजरेने पहा. आजच्या काळामध्ये चांगले संगीत नाही, संगीत कळत नाही, तरुण पिढीला भान नाही आणि ज्ञान नाही अशी खंत व्यक्त करताना आगामी काळात जिल्ह्यात व तालुक्यात तमाशा व संगीत महोत्सवाचे आयोजन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तर मा मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयामुळे नवे दालन सुरू झाले आहे. संगीताला वयाची, जात धर्म, पंथाची कशाची अट नाही .निसर्गाने मानवाला आनंद देणारी संगीत ही देणगी दिली आहे. शास्त्रोक्त संगीताचा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे . सर्वांना एकत्र आणण्याची ताकद संगीतामध्ये आहे.
रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संपूर्ण तमाशा विश्वाचा सन्मान करणारा असून संगमनेरला हा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान आम्हा सर्वांना असल्याचे ते म्हणाले याचबरोबर संगीत हे मोठे व्यापक क्षेत्र असून या नव्या विद्यालयातून चांगले कलावंत निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तर मा आ डॉ तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे कलासक्त नेतृत्व आहेत. साहित्य कला, संस्कृती अशा सर्व गोष्टी त्यांनी संगमनेर मध्ये राबविल्या आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती ही समाजाच्या परिपूर्णतेचे लक्षण असून संगमनेरचे हे संगीत विद्यालय जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना नुकतेच निधन झालेले स्वर्गीय डॉ सोमनाथ सातपुते यांनी सह्याद्री संस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी डॉ. संतोष खेडलेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद राऊत यांनी केले सूत्रसंचालन प्रा कोमल म्हस्के यांनी केले तर उपप्राचार्य संजय सुरसे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर मधील कलाक्षेत्रातील विविध मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लतादीदींच्या हस्ते दादांचा गौरव तर आशाताईंची संगमनेरला भेट
संगीत क्षेत्र म्हटलं की भारतरत्न लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे नाव पहिले येत. लता मंगेशकर यांच्या हस्ते दादांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी लतादीदींनी संगमनेरला येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यानंतर आशा भोसले संगमनेरला आल्या. याचबरोबर जावेद अली , शबाना आजमी, विवेक ओबेराय , यांच्यासह आणि अनेक दिग्गज कलाकार संगमनेर मध्ये आले असल्याचे मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले



