एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा ९६ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा ९६ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा ९६ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२६: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे पद्मभूषण, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला अखेरपर्यंत साथ देणाऱ्या रयतमाऊली कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा ९६ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर येथील मराठी विभागाचे संशोधन केंद्रप्रमुख व सहयोगी प्रा.डॉ. कैलास महाले उपस्थित होते. सदर सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथ शिंदे यांनी शुभेच्छा संदेश पाठविला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.

प्रा.डॉ. कैलास महाले यांनी आपल्या मनोगतात लक्ष्मीबाईंच्या त्याग, समर्पण आणि शिक्षणप्रेमाचा विशेष उल्लेख केला. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याच्या कार्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीला लक्ष्मीबाईंचा त्यागमय पाठिंबा लाभल्याचे त्यांनी सांगितले.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लक्ष्मीबाईंनी स्वतःचे दागिने अर्पण केले, हा त्यांचा त्याग मातृवत व्यक्तिमत्त्वाचे ज्वलंत उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला. आर्थिक अभावातही शिक्षणाचा ध्यास कायम ठेवताना लक्ष्मीबाईंनी दिलेला त्याग संस्थेच्या उभारणीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची आईप्रमाणे काळजी घेतल्यामुळेच त्यांना “रयतमाऊली” ही उपाधी लाभल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गुढीपाडवा निमित्त महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्टाफ वेलफेअर समितीमार्फत ‘मिष्टान्न भोजन’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे निवड करण्यात आलेल्या गुणवंत प्राध्यापक व रयत सेवकांचा मानांकन देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत डॉ. संतोष पवार यांनी केले. या प्रसंगी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय शिंदे, वरिष्ठ वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. डॉ. सीमा दाभाडे,डॉ. भागवत देवकाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले.



