विद्यार्थ्यांना अधिकारी घडविण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा अभिमान- ना.विखे पाटील

विद्यार्थ्यांना अधिकारी घडविण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा अभिमान- ना.विखे पाटील
विद्यार्थ्यांना अधिकारी घडविण्याचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा अभिमान- ना.विखे पाटील

Loni vijay kapse दि.१२ एप्रिल २०२६– “ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे स्वप्न आता सत्यात उतरत असल्याचा निश्चितच अभिमान वाटतो. प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून भविष्यातही जास्तीत जास्त विद्यार्थी घडावेत आणि त्यांनी प्रशासकीय सेवेत आपला नावलौकिक निर्माण करावा,” अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या राहाता तालुक्यातील चार ठिकाणी ही केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत १५८ विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवेत निवड झाली असून, सध्या २१३ विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती नामदार विखे पाटील यांनी दिली.

“प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून राहता तालुक्यातील वृंदा बाळासाहेब निर्मळ (सहायक विक्रीकर अधिकारी, मुंबई), अवधूत भास्कर भुजबळ (ठाणे पोलीस प्रशासन), तुषार सुनील डांगे (ठाणे पोलीस प्रशासन), अक्षय कैलास निर्मळ (पुणे पोलीस प्रशासन) आणि किरण भास्कर शेलार (पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती), सौरभ घोरपडे (ज्युनियर असिस्टंट), साहिल जाधव (पुणे शहर पोलीस), गणेश जगताप (महाराष्ट्र सुरक्षा दल), निखिल जगताप (महाराष्ट्र सुरक्षा दल) यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी जनता दरबारामध्ये या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या.”
यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, “अतिशय मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आहेत, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या भागातील तरुण प्रशासकीय सेवेत दाखल होत असल्याचे मोठे समाधान वाटते.” दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी ‘जनता दरबार’ आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, निर्धारित वेळेत लोकांची कामे मार्गी लावण्याचे आदेशही दिले.



