राहाता तालुक्यात ‘अहिल्यादेवी जलयात्रे’चे उत्साहात स्वागत;

राहाता तालुक्यात ‘अहिल्यादेवी जलयात्रे’चे उत्साहात स्वागत
राहाता तालुक्यात ‘अहिल्यादेवी जलयात्रे’चे उत्साहात स्वागत
Kopargaon vijay kapse दि २६ एप्रिल २०२६-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलसंवर्धनाच्या कार्याचा विचार राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाठबळ देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. जलयात्रेचे राहाता तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. गावोगावी शेतकरी, वारकरी, युवक आणि महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरत आहे.

लोणी बुद्रुक, कोल्हार आणि बाभळेश्वर येथे जलयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या शेतकरी, कार्यकर्ते आणि महिलांशी संवाद साधून त्यांनी यात्रेची संकल्पना विशद केली. लोणी बुद्रुक येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यासह लोणी बुद्रुक गावचे ग्रामस्थ तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले.

कोल्हार येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली “महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने निर्णय घेत आहे. यामध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशीलपणे काम सुरू असून, दुष्काळाच्या संघर्षातून गावांना बाहेर काढण्यासाठी क्रांतिकारी निर्णय होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी तीनशे वर्षांपूर्वी या देशातील जलसंवर्धनाच्या कामाचा जो आदर्श सर्वांसमोर ठेवला, तोच विचार आज उपयोगी पडत आहे.”

“पाण्याचे संवर्धन करायचे असेल तर त्याचे व्यवस्थापन चोख हवे; यासाठी जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करीत आहे. राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पाच्या कामांना गती दिली असून, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पाण्याची उपलब्धता करून ही गावे दुष्काळमुक्त करण्याच्या प्रयत्नांना या यात्रेतून पाठबळ मिळेल,” असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती त्यांच्या ३०० व्या जयंती दिनानिमित्त सर्वदूर पोहचवावी, असा महायुती सरकारचा उद्देश आहे. जलव्यवस्थापनामध्ये घाट, विहिरी आणि बारव ही बलस्थाने असल्याने अशा जुन्या व्यवस्थांचे पुनरुज्जीवन करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महायुती सरकार हे समाजातील बारा बलुतेदारांसाठी काम करणारे सरकार आहे. यामध्ये शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असून, त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. कर्जमाफीपासून ते मोफत वीजेपर्यंतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. पाण्याच्या संकटातून गावांना बाहेर काढण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अतिशय मेहनतीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.




